-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोविडच्या (Covid) आजारासंदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना आखत अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये विशेषत: ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्याच्याबाबत तयारी करावी अशाप्रकारच्याही सूचना केल्या आहे. त्यानुसार मुंबई महापालिका प्रशासन सज्ज असून कोविड काळामध्ये उपनगरीय रुग्णालयांमध्ये बसवलेले ऑक्सिजन प्लांट हे तसेच असून सध्या हे प्लांट कार्यान्वित नसले तरी प्रशासनाच्या निर्देशानुसार हे प्लांट पुढील १५ दिवसांमध्ये कार्यान्वित होऊ शकतात अशाप्रकारची माहिती मिळत आहे.
कोविडच्या (Covid) आजाराचा प्रादुर्भाव होत असल्याने या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रथम सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयात काही खाटा आरक्षित केल्यानंतर उपनगरीय रुग्णालयांसह मोठी रुग्णालये तसेच कोविड जंबो सेंटरमध्येमध्ये संशयित रुग्णांसह बाधित रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु कोविड आजार संपुष्टात आल्यानंतर जंबो कोविड सेंटर बंद करून त्याचे साहित्य एका बाजूला जतन करून ठेवण्यात आले आहे. त्याप्रमाणे या जंबो कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट बंद करून ते साहित्य सेव्हन हिल्स रुग्णालयात सांभाळून ठेवण्यात आले आहे.
(हेही वाचा – State Government : अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले…)
तसेच, उपनगरीय १६ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट हे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड (Covid) संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये वाढत्या कोविड आजारासंदर्भात मार्गदर्शक सूचना करून कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि कशाप्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी तयारी असावी अशाप्रकारे सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी आरोग्य विभागाचा यासंदर्भात आढावा घेतला.
यामध्ये उपनगरीय रुग्णालयांमधील ऑक्सिजन प्लांट हे पुन्हा सुरु करता येतील अशाप्रकारची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपनगरीय रुग्णालयांमध्ये बंद स्थितीत असलेले ऑक्सिजन प्लांट हे प्रशासनाच्या निर्देशानुसार पुढील १५ दिवसांच्या अवधीमध्ये कार्यान्वित केले जातील अशाप्रकारची माहिती दिली आहे. हे प्लांट तात्पुरत्या स्वरुपात बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र प्रशासनाचे ज्याप्रकारे निर्देश असतील त्यानुसार हे प्लांट उपनगरीय रुग्णालयांमध्ये कार्यान्वित केले जातील, अशी माहिती मिळत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community