Credit Card Limit : तुमची बँक क्रेडिट कार्डाची मर्यादा कमी करू शकते का?

क्रेडिट कार्डाचं बिल वेळेत भरलं नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअरही कमी होतो

139
Credit Card Limit : तुमची बँक क्रेडिट कार्डाची मर्यादा कमी करू शकते का?
Credit Card Limit : तुमची बँक क्रेडिट कार्डाची मर्यादा कमी करू शकते का?
  • ऋजुता लुकतुके

जुलै २०२३ पासून काही बँकांनी अचानक ग्राहकांना पत्रं पाठवली. आणि यात तुमच्या क्रेडिट कार्डाची मर्यादा कमी केल्याचं कळवलं. तेव्हापासून एक प्रश्न विचारला जातोय, बँकांना क्रेडिट कार्डावरील मर्यादा कमी करता येते का? सध्या खासकरून एसबीआयच्या काही क्रेडिट कार्डधारकांना बँकेकडून पत्र येत आहेत. आणि त्यात तुमच्या क्रेडिट कार्डावरील खर्चाची मर्यादा कमी करण्यात येत असल्यांच नमूद केलेलं असतं. फक्त एसबीआय नाही तर एचडीएफसी, आरबीएल आणि इतरही क्रेडिट कार्ड धारकांना असे संदेश येत आहेत. त्यामुळे लोकांना प्रश्न पडला आहे की, एकदा क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर त्याची मर्यादा बँकेला कमी करता येते का?

याचं उत्तर ‘हो’ असंच आहे. आणि कार्ड घेताना बँकेबरोबर आपण जो करार करतो, त्या दोन गोष्टी नमूद केलेल्या असतात. पहिली, बँक कार्ड रद्द करू शकते. आणि दुसरी, कार्डावरील कर्जाची मर्यादा कमी करू शकते. इतरही काही अटी आणि शर्ती असतातच. तेव्हा कारणं जाणून घेऊया ज्यामुळे तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा कमी करू शकते.

क्रेडिट कार्डावरील रकमेची परतफेड वेळेत होत नसेल – 

रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, क्रेडिट कार्डाची न भरलेली बिलं मार्च २०२३ पर्यंत ४,०७२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहेत. तर थकित बिलं तब्बल २.१० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. ‘तुम्ही वेळेत क्रेडिट कार्डाचं बिल भरत नसाल आणि असं काही महिने सातत्याने झालं तर बँक तुमची क्रेडिट कार्डाची मर्यादा कमी करू शकते,’ गुंतवणूक तज्ज्ञ देवदत्त धनोकर यांनी स्पष्ट केलं. शिवाय तुम्ही वेळेत क्रेडिट कार्डाचं बिल वेळेत भरलं नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअरही कमी होतो. आणि त्याचा परिणाम नवीन कर्ज घेताना किंवा बँकेच्या इतर सुविधा मिळवताना जाणवतो.

क्रेडिट कार्डाचं बिल येतं तेव्हा दोन रकमा लिहिलेल्या असतात. एक ‘मिनिमम अमाऊंट ड्यू’ म्हणजेच किमान भरायची रक्कम. तर दुसरी असते संपूर्ण बिलाची रक्कम. लोक अनेकदा किमान रक्कम भरतात. आणि बाकीचं देणं तसंच वाढत जातं. पण, यालाच कर्जाचा विळखा किंवा ‘डेब्ट ट्रॅप’ असं म्हणतात. हे कर्ज वाढू न देणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. त्यामुळे क्रेडिट कार्डाचं बिल वेळेत आणि पूर्ण भरा असा सल्ला सल्लागार देतात.

थकलेली बिलं –

बिलातील थोडीच रक्कम भरणं सोडाच अनेकांना क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर त्याचं बिलच भरता आलेलं नाही. सिबिलचा अहवाल असं सांगतो की, थकित बिलांचं प्रमाण जून २०२३ पर्यंत २.९४ टक्क्यांनी वाढलं आहे. ज्यांना ९० दिवसांपेक्षा जास्त काळ बिल भरता आलं नाही अशा घटना तर ६६ अंशांनी वाढल्या आहेत.

थकित बिलांबद्दलची बँकांची भूमिका ही बऱ्याचदा लवचिक असते. म्हणजे बँकांशी संवाद साधून तुम्ही थकित बिल कधी आणि कसं भरू शकता हे बँकांना पटवून देऊ शकलात तर ते लगेच कारवाईही करत नाहीत. पण, तुमचं म्हणणं त्यांना समजून सांगता आलं पाहिजे. क्रेडिट कार्ड थकबाकी देताना एक पर्याय तुम्हाला बँका देतात तो हफ्त्या हफ्त्यांनी परतफेड करण्याचा. पण, त्यासाठी थोडा जास्त व्याजदर लावला जातो. बिल पूर्णपणे थकवलं तर मात्र पहिली पायरी क्रेडिट मर्यादा कमी करण्याची असू शकते. आणि ज्यांचा पगार कमी आहे अशा लोकांवर तर अशी कारवाई प्रथम होते.

क्रेडिटचा जास्त वापर – 

क्रेडिट कार्डावर केलेला खर्च हे बँकेनं तुम्हाला कमी मुदतीचं आणि कमी व्याजाने दिलेलं एक प्रकारचं कर्जच असतं. आणि ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत तुम्हाला ते वापरता येतं. पण, तुमचा क्रेडिट कार्डाचा वापर वाढला किंवा गणिताच्या भाषेत तुमच्याकडे उपलब्ध असलेली कर्ज मर्यादा आणि तुम्ही करत असलेला कार्डाचा वापर यांचं गुणोत्तर.

तुमची कर्ज मर्यादा १ लाखांची असेल आणि महिन्याला तुम्ही सरासरी ४०,००० रुपयांचा वापर करत असाल तर तुम्ही ४० टक्के वापर केला असा अर्थ होतो. पण, तुमच्याकडे दोन कार्डं असतील आणि दोघांची मर्यादा ७५,००० असेल तर तुम्ही ४०,००० रुपये महिन्याला खर्च केलेत तरी तुमचं क्रेडिट कार्ड वापराचं गुणोत्तर २७ टक्के भरतं. हे गुणोत्तर जितकं कमी तितकं चांगलं. आणि त्याचा अर्थ तुम्ही जबाबदार क्रेडिट कार्ड वापरकर्ते आहात. तुमचं क्रेडिट वापराचं गुणोत्तर सातत्याने ७० टक्क्यांच्या वर राहायला लागलं तर बँक कारवाई करू शकते.

क्रेडिट कार्डाची मर्यादा अचानक वाढली – 

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डं असतील तर तुमच्याकडची क्रेडिट मर्यादा आपोआप वाढते. कमी कालावधीत अशी क्रेडिट मर्यादा वाढली तर बँक अशा ग्राहकांना लाल यादीत टाकते. कारण, त्यांची कर्ज परतफेडीची शक्यता तितकी कमी होत असते. त्यांना एकावेळी अनेक कार्डांवरील बिलं भरावी लागतात. आणि कर्ज काढण्याची त्यांची प्रवृत्तीही बळावण्याची शक्यता असते.

सध्या तुमच्याकडे दहा क्रेडिट कार्ड असतील आणि एकूण मर्यादा ५० लाखाची असेल. पण, पुढच्या दोन वर्षांत तुमच्याकडे १० नवीन क्रेडिट कार्ड आली आणि एकूण कर्ज मर्यादा एक कोटींवर गेली. अशावेळी बँकेला हे लक्षात आल्यावर ते कर्ज मर्यादा कमी करण्याचं पाऊल उचलू शकतात.

आर्थिक अनिश्चितता – 

काहीवेळा समस्या अर्थव्यवस्थेशी निगडित असू शकते. एकूणच अर्थव्यवस्थेसमोर अडचणी असतील आणि बेरोजगारी, महागाई अशा मूलभूत समस्यांतून देश जात असेल तर बँकाही क्रेडिट कार्ड किंवा कर्ज देताना विचार करतात. बेरोजगारीचं प्रमाण वाढत असताना शक्यतो बँका क्रेडिट कार्ड देतानाही विचार करतात. आणि त्याची मर्यादाही कमी ठेवतात.

आता बँकांनी पाठवलेली पत्रंही कोरोना नंतरच्या काळात उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे असू शकतात. एकूणच कर्जावरील व्याजदर वाढले आहेत. अशावेळी बँकांची क्रेडिट कार्डाविषयीची भूमिका कठोर असू शकते.

(हेही वाचा – Inflation : महागाई कमी करण्यासाठी सरकार नेमकी कोणती पावलं उचलतंय?)

वापरात नसलेलं क्रेडिट कार्ड – 

वर दिलेल्या अनेक कारणांबरोबरच आणखी एक कारण आहे ते म्हणजे न वापरता पडून राहिलेलं क्रेडिट कार्ड. कारण, बँकांची कमाई आपण कार्ड वापरतो तेव्हाच होते. खूप काळासाठी तुम्ही कार्ड वापरलंच नाहीत तर बँकांना त्यातून काही फायदा नसतो. कार्डासाठी आपण भरत असलेले चार्जेस, व्याज यातून बँकांची कमाई होते.

त्यामुळे वापरात नसलेल्या कार्डाची मर्यादा कमी करून ती जास्त वापरात असलेल्या दुसऱ्या एखाद्या खात्याला देण्याचा विचार तुमची बँक करू शकते. काही वेळा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ न वापरलेलं क्रेडिट कार्ड रद्दही होऊ शकतं.

तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा कमी झाली तर काय कराल? 

पहिली गोष्ट, तुम्ही बँकेला संपर्क करून बिल न भरण्यामागचं कारण समजावून सांगू शकता. तुमचं कारण योग्य असेल तर बँक तुमची जुनी क्रेडिट मर्यादा तुम्हाला पुन्हाही बहाल करू शकते. किंवा थकित बिल भरण्यासाठी तुम्हाला बिलाची पुनरर्चना करून देऊ शकते. तुम्ही किती मुदतीत कर्जाची परतफेड करू शकाल हे बँकेला सांगितलंत तर क्रेडिट मर्यादा तुम्हाला पुन्हा दिली जाऊ शकते. त्यासाठी बँकेच्या कस्टमर केअरला फोन करणं महत्त्वाचं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.