सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्याला आता स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) मिळणार आहे. जतमध्ये MH-59 या नवीन वाहन नोंदणी क्रमांकाने हे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी शुक्रवारी मंत्रालयात पत्रकार परिषदेत केली. सरनाईक यांनी सांगितले की, “जत तालुक्यातील वाहनांची वाढती संख्या, लोकसंख्या आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी लक्षात घेता या निर्णयाची आवश्यकता होती.”
आमदार गोपिचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याला यश
जतचे आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जत येथे आरटीओ (RTO) कार्यालय सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत परिवहन विभागाने आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून शासन निर्णय प्रसिद्ध केला असल्याची माहिती सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.
(हेही वाचा – मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी नगरसेवक Harshad Karkar आणि युवानेत्री दिक्षा कारकर यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश)
जनतेला मिळणार मोठा दिलासा
सध्या जत तालुक्याच्या नागरिकांना वाहन नोंदणी, लायसन्स, कर भरावणे, वाहन परीक्षण आदी कामांसाठी सुमारे १०० ते १२० किलोमीटर दूर असलेल्या सांगली कार्यालयात जावे लागत होते. आता जत येथेच आरटीओ (RTO) कार्यालय सुरू झाल्याने वेळ, पैसा आणि श्रमाची मोठी बचत होणार आहे. सरनाईक म्हणाले, “हा निर्णय सामान्य जनतेच्या दृष्टीने दिलासादायक असून, ग्रामीण भागातील नागरी सुविधांचा विस्तार करण्याच्या शासनाच्या धोरणानुसार घेतला गेला आहे.”
जतला मिळणार ‘MH-59’
या नव्या आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून जत येथील वाहनांना स्वतंत्र क्रमांक मालिका मिळणार असून MH-59 ही नोंदणी मालिका यापुढे जतसाठी वापरण्यात येईल. या निर्णयामुळे जत तालुक्यातील नागरिकांना विविध वाहतूक परवाना व नोंदणीसाठी आता स्थानिक स्तरावरच सेवा मिळणार असून, हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community