विलेपार्ले पूर्व येथील सुभाष रोडवरील अनेक वर्षांपासून पडिक असलेल्या आणि अडीच ते तीन वर्षांपूर्वी ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडावर अखेर महापालिकेच्यावतीने वाचनालय तथा अभ्यासिका बनवली जात आहे. एकाच वेळी १०० मुलांना अभ्यास करता येईल अशाप्रकारची ही वास्तू असून या वास्तूच्या बांधकामासाठी महापालिकेने कंत्राटदाराची निवड केली आहे. त्यामुळे पुढील आठ महिन्यांमध्ये या अभ्यासिकेचे काम पूर्ण होऊन विभागातील विद्यार्थ्यांना याठिकाणी शांत वातावरणात अभ्यास करता येणार आहे.
( हेही वाचा : पश्चिम उपनगरवासियांसाठी मोठी बातमी : कूपर रुग्णालयातही हृदयरोगावरील ‘अँजिओप्लास्टी’ शस्त्रक्रिया )
विलेपार्ले पूर्व येथील सुभाष रोडवर सुमारे १११ चौरस मीटरचा आरक्षित भूखंड असून तो वाचनालय तथा अभ्यासिकेकरता राखीव आहे. या विभागातील भूखंडाचा विकास केल्यानंतर पाच टक्के सूखसोयींकरता राखीव भूखंड मागील अनेक वर्षांपासून पडिक होता. हा भूखंड महापालिकेच्यावतीने ताब्यातही घेतला गेला नसल्याने त्याचा गैरवापर होत होता. त्यामुळे हा भूखंड वाचनालय तथा अभ्यासिकेकरता राखीव असल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्कालिन नगरसेवक अभिजित सामंत यांनी यावर अभ्यासिका बनवण्याची मागणी करत प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
त्यामुळे अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि महापालिकेने याच्या बांधकामासाठी निविदा मागवली. त्या निविदेत एसव्हीजे इनोव्हाबिल्ड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीकडून विविध करांसह १ कोटी २२ लाखांमध्ये या वास्तूचे बांधकाम केले जाणार आहे. यामध्ये तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम व इतर सुविधा असणार आहे.
हा आरक्षित भूखंड पडिक असल्याने स्थानिक नगरसेवक असलेल्या अभिजित सामंत यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर महापालिका आयुक्तपदी प्रविणसिंह परदेशी आल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा भूखंड ताब्यात घेऊन त्यावर आरक्षणानुसार अभ्यासिकेचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराची निवड करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे. हा भूखंड अनेक वर्षे पडिक होता. तसेच पूर्वी महापालिकेच्या शाळांमध्ये अभ्यासिका चालवल्या जायच्या. त्या महापालिकेने बंद केल्याने विभागातील मुलांची अभ्यासाकरण्यास गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिका शाळांचे वर्गांमध्ये अभ्यासिका चालवल्या जाव्यात अशाप्रकारची मागणी तत्कालिन आयुक्त परदेशी यांच्याकडे केल्यांनतर त्यांनी या विभागातील आरक्षित भूखंड असल्यास कायमस्वरुपी बांधून देण्याची तयारी दर्शवली. त्यातून या वास्तूची उभारणी होत असून एकाच वेळी १०० मुले याठिकाणी अभ्यास करू शकतात. मुले व मुलींना स्वतंत्रपणे बसण्याची सुविधा असेल,असे त्यांनी स्पष्ट केले आहे.