ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी (Arvind Vitthal Kulkarni) यांचे रविवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत. त्यांच्या निधनसमयी त्यांचे पुत्र डॉ. मल्हार आणि केदार मुंबईत नसल्यामुळे आज, सोमवारी दुपारनंतर मुंबई आयआयटीमधील निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघेल. पवई येथील मोक्षधामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेले चार दिवस छातीत थोडासा कफ साचून त्यांना त्रास होत होता. परंतु ते घरीच विश्रांती घेत होते. त्याही स्थितीत त्यांना दोन विषयांवर त्यांच्या ‘अधोरेखित’ या यु ट्युब वाहिनीवर भाष्यपट करायचा होता.
(हेही वाचा – Scare At Lucknow Airport : आता लखनऊ विमानतळ ! सौदी एअरलाईन्सच्या विमानातून ठिणग्या आणि धूर)
आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’मधून (Maratha) पत्रकारितेला प्रारंभ करणाऱ्या अरविंदरावांनी त्यानंतर दीर्घकाळ इंग्रजी भाषेतील ‘मिड डे’ (Mid-day) मध्ये राजकीय संपादक या पदावर काम केले. तिथे कार्यरत असताना खलिद अन्सारी सारखा मुस्लिम मुख्य संपादक असतानाही त्यांनी आपली हिंदुत्त्व विचारधारा न लपवता वा सोडता व्रतस्थपणे पत्रकारिता केली. महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत जवळून पाहणारा, त्यातून विविध पक्ष संघटनांच्या नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी निर्माण झालेल्या संबंधांतून राष्ट्रीय महत्वाच्या विषयावर आशय निर्मिती करणारा, भाष्य करणारा एक लढवय्या पत्रकार (Nationalist Journalist) म्हणून अरविंदराव स्मरणात राहतील.
स्वा. सावरकर, डॉ. हेडगेवार, पु. भा. भावे अशी श्रद्धास्थाने असलेल्या अरविंदरावांनी काही वर्षे साप्ताहिक विवेक, मासिक धर्मभास्करचेही संपादन केले होते. ‘हिंदुस्थान समाचार’ (Hindustan Samachar) या राष्ट्रीय वृत्तसंस्थेचे मुंबईतील ब्युरो प्रमुख म्हणूनही त्यांनी लक्षणीय काम केलं होतं. अनेक तरुणांना राष्ट्रीय विचाराच्या पत्रकारितेचे धडे दिले होते.
जवळपास दशकभर पु. भा. भावे स्मृती समितीचे कार्यवाह म्हणून त्यांनी मुंबई आणि परिसरात अनेक उपक्रम केले होते. गेली चार वर्षे ते ‘अधोरेखित’ नावाच्या यु ट्युब वाहिनीवर भाष्यपट प्रस्तुत करीत होते. त्यातूनही अनेक वैचारिक विमर्शाचे आणि हिंदुत्ववादी विचारांचे विषय मांडत असत.
त्यांचा ज्येष्ठ मुलगा डॉ. मल्हार मुंबई आयआयटीमध्ये संस्कृत भाषा विभागप्रमुख आहेत. तर केदार अरुणाचल प्रदेशात वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून गेली जवळपास दोन दशके काम करीत आहे. ओंकार कुलकर्णी हा त्यांचा धाकटा मुलगा इंग्रजी भाषेतील कवी असून चित्रपट आणि मालिका क्षेत्रात लेखक – अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. (Arvind Vitthal Kulkarni)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community