-
सचिन धानजी, मुंबई
मुंबईतील छोट्या आणि मोठ्या नाल्यातील गाळाची सफाई तसेच मिठी नदीच्या सफाईच्या कामाला मागील एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्षात सुरुवात झाली असली तरी आतापर्यंत ही एकूण सफाई केवळ ६५.४५ टक्के एवढीच झाली आहे. परंतु, यंदा पावसाने लवकरच हजेरी लावल्यामुळे नालेसफाईच्या कामाचे तीन तेरा वाजले गेले आहे. नाल्यातील गाळ काढण्यात आल्यानंतर तो गाळ नाल्याच्या शेजारी सुकवण्यासाठी ठेवला जातो. परंतु काढलेला गाळ आणि नाल्यातील न काढलेला गाळही या पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेल्याने प्रशासनाला गाळ सफाईचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही. त्यामुळे यंदा मुंबईचे काही खरे नसून ही सफाई जानेवारी महिन्यापासून न केल्याने यंदाही परिस्थिती उद्भवली असून यातून महापालिका काही धडा घेणार का असा सवाल उपस्थित होत आहे. (Nala Safai)
मुंबईतील छोट्या आणि मोठ्या नाल्यांसह मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आता या सर्व नाल्यांमधील आता गाळाची सफाई ही आजमितीस ६५.४५ टक्के एवढीच झालेली आहे. पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्या दरम्यान १० टक्के आणि पावसाळ्यानंतर १० टक्के अशाप्रकारे नाल्यातील गाळ काढणे अपेक्षित असते. त्यानुसार या सर्व नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी ९,६१,६८० मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित होते. परंतु त्यातून आतमितीस केवळ ६,२९, ३९३ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. यामध्ये शहरात ७०.२२ टक्के, पूर्व उपनगरात ८६.२१ टक्के, पश्चिम उपनगरात ८७.७२ टक्के, मिठी नदीचे ४९.९२ टक्के आणि छोट्या नाल्याची सफाई ५५.२८ टक्के एवढी झाल्याचे दिसून येत आहे. (Nala Safai)
(हेही वाचा – Indo – Pak Tension : पाकिस्ताने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द मनाई महिन्याभरासाठी वाढवली)
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नालेसफाईच्या कामांसाठी कंत्राटदारांची नेमणूक केली असली तरी प्रत्यक्षात नाल्यातील गाळ प्रत्यक्षात वजन काट्यावर मोजल्या जाणाऱ्या मापाप्रमाणेच त्यांनी काढलेल्या गाळाची नोंद होते. त्यानुसारच त्यांना त्यांची बिले अदा केली जातात. त्यामुळे कंत्राटदारांनी काढलेल्या गाळापैंकी वजन काट्यावरील नोंदीनुसारच सध्या सफाईची टक्केवारी ठरत आहे. त्यामुळे नाल्यातील तसेच मिठी नदीतील गाळ कडेला किंवा बाजूला काढून ठेवून तो सुकल्यानंतर त्याची विल्हेवा वजन काट्यावर मापन केल्यानंतर निश्चित केलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर लावली जाते. (Nala Safai)
मात्र, ८० टक्के नालेसफाईचे टार्गेट हे ३१ मे पर्यंत असले तरी यंदा पावसाने दहा ते बारा दिवस आधीच हजेरी लावल्यामुळे नाल्यासह मिठी नदीच्या शेजारी सुकवण्यासाठी ठेवलेला गाळ पुन्हा या पावसात रस्त्यावर तसे आसपासच्या भागात वाहून गेला आहे. तसेच अनेक छोट्या आणि मोठ्या नाल्यांसह मिठी नदीतील गाळाची सफाई न झाल्याने मुसळधार पावसाच्या प्रवाहामुळे यातील गाळही वाहून गेला आणि त्यासोबत तरंगता कचराही वाहून केला. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून परिसर जलमय होऊ नये म्हणून नालेसफाई केली जात असली तरी यंदा मात्र, वेळीच सफाईचे काम न झाल्यामुळे नाल्याबाहेर काढलेला आणि नाल्यातील न काढलेला गाळही या पावसात वाहून गेल्याने कंत्राटदारांना आपली पोकलेन मशिन्स, रोबो तसेच पन्टून मशिनवरील पोकलेन लाँग ब्रूमही बाहेर काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नालेसफाईचा गाळ पावसाने लवकर आगमन केल्याने वाहून गेल्याने आता कंत्राटदारांना गाळ काढणे आणि तो गाळ सुकवून त्याचे वजन करून विल्हेवाट लावणे मोठे आव्हान ठरत आहे. (Nala Safai)
मागील काही वर्षांपासून जून किंवा त्यानंतरच पावसाची प्रत्यक्षात हजेरी लागली गेली आहे. त्यामुळे आजवर नालेसफाईचे काम मे आणि जून महिन्याच्या मध्यान्हापर्यंत केली जात असली तरी यंदा हे महापालिकेच्या नियोजनाचे गणित पावसाने बिघडवून टाकले आहे. त्यामुळे नाल्यातील गाळाची सफाई पुढील वर्षांपासून तरी जानेवारी महिन्यापासून हाती घेतली जाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Nala Safai)
(हेही वाचा – fish curry recipe in marathi : तोंडाला पाणी सुटेल अशी अस्सल मराठी स्टाइल फिश करी म्हणजे माश्याचं कालवण)
नालेसफाईच्या कामांची आकडेवारी टक्केवारीमध्ये :
मुंबईतील एकूण नालेसफाई : ६५.४५ टक्के
काढण्यात येणारा अपेक्षित गाळ : ९,६१,६८० मेट्रीक टन
काढण्यात आलेला आतापर्यंतचा गाळ : ६,२९,३९३
शहरातील नालेसफाई : ७०.२२ टक्के
पूर्व उपनगरातील नालेसफाई : ८६.२१ टक्के
पश्चिम उपनगरातील नालेसफाई : ८७.७२ टक्के
मिठी नदीतील सफाई : ४९.९२ टक्के
छोट्या नाल्यातील सफाई : ५५.२८ टक्के
हेही पहा –
Join Our WhatsApp Community