Nair Hospital : नायर दंत रुग्णालय महाविद्यालयात बीडीएस पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी वाढणार; ‘हे’ आहे कारण

290
Nair Hospital : नायर दंत रुग्णालय महाविद्यालयात बीडीएस पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी वाढणार; 'हे' आहे कारण
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 
बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित नायर दंत रुग्णालय आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयात दैनंदिन वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, अधिकाधिक दर्जेदार सेवा देणे आगामी काळात शक्य होणार आहे. रुग्णालयात अधिक क्षमतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याकरिता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि भारतीय दंत वैद्यकीय परिषद (डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया) यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) या पदवी अभ्यासक्रमासाठी अधिक विद्यार्थी प्रवेश करणे महाविद्यालयाला शक्य झाले आहे. (Nair Hospital)
नायर दंत रुग्णालय व दंत वैद्यकीय महाविद्यालयाला बीडीएस पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्येतील क्षमता वाढीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत दंत वैद्यकीय शाखेकडून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या ६७ वरून ७५ झाली आहे. भारतीय दंत वैद्यकीय परिषद (डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया) यांचेकडूनही या मान्यतेसाठी शिफारस करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वाढीव जागांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) श्रेणीअंतर्गत सन २०१७ मध्ये ६०-६७ आणि नंतर ६७-७५ विद्यार्थी संख्येतील वाढ करण्यात आली होती. या वाढीसाठी मान्यता प्राप्त झाली आहे. या विद्यार्थी क्षमतावाढ मान्यतेसाठी एकूण चार वर्षांचा कालावधी लागला आहे. या कालावधीत भारतीय दंत वैद्यकीय परिषद व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एम. यू. एच. एस.) यांच्यातर्फे आकस्मिक भेटी व पाहणी दौरे घेण्यात आले. (Nair Hospital)
सन २०२५ मध्ये ७५ विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या बॅचमधून उत्तीर्ण झाल्यानंतर आता मान्यता मिळाली आहे आणि भारत सरकारकडून मान्यता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. नायर रुग्णालय आणि दंत महाविद्यालयामार्फत समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात येतात. विद्यार्थी संख्येत वाढ झाल्यामुळे रुग्णालयाची जबाबदारी देखील वाढली आहे. त्यामुळे नायर दंत रुग्णालयाने दर्जेदार रुग्णसेवेतील सातत्य कायम ठेवावे, अशा सूचना  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. (Nair Hospital)
नायर रुग्णालय आणि दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे म्हणाल्या की, “बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या पदवी अभ्यासक्रमांतर्गत एकूण ७५ विद्यार्थ्यांची तुकडी यंदा उत्तीर्ण झाली आहे. विद्यार्थी क्षमतेची मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेत रुग्णालयातील पायाभूत सुविधा विकास, मनुष्यबळातील वाढ आणि रुग्णसेवांमध्ये करण्यात आलेली सुधारणा यांचा समावेश आहे. नायर दंत महाविद्यालयाची स्थापना १९३३ मध्ये झाली. रुग्णसेवेतील ९१ वर्षांचा टप्पा या संस्थेने पूर्ण केला आहे. देशातील सर्वात जुन्या दंत रुग्णालयांमध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय आहे. वाढत्या रुग्णभाराच्या पार्श्वभूमीवर पदवी अभ्यासक्रमामध्ये अधिक विद्यार्थीसंख्येसाठी मान्यता प्राप्त होणे ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात विद्यार्थी संख्या १०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने पायाभूत सुविधांमध्ये वाढ तसेच मनुष्यबळाचा समावेश करण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया प्रगतिपथावर आहे,” असेही डॉ. अंद्राडे यांनी सांगितले. (Nair Hospital)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.