हे ‘Best’ झाले !

106
हे 'Best' झाले !
हे 'Best' झाले !
  • सचिन धानजी

अखेर बेस्ट बसचे भाडे वाढले. तुमच्या आमच्या मनात जे होतं ते घडलं. तोट्यात चाललेल्या बसेसचे केवळ पाच आणि सहा रुपये तिकीट हे आपल्यालाच बघवत नव्हते. वेळेत पोहोचायचे म्हणून आपण शेअर रिक्षा आणि टॅक्सीसाठी माणसी दहा, पंधरा आणि वीस रुपये (अंतराप्रमाणे) मोजायला तयार असतोच. हे प्रवास भाडे भरताना आपण कुठला आखडता हात घेत नसतो किंवा नव्हतोच. पण जिथं आपण शेअर रिक्षा, टॅक्सीला माणसी १५ ते २० रुपये मोजत होतो, तेव्हा पाच ते सहा रुपयांमधील एसी बसेसमधील गारेगार प्रवास पाहून आपलीच आपल्याला लाज वाटत होती.

एका बाजुला बेस्ट ही आपली आहे, मुंबईची ओळख आहे आणि हीच बेस्ट (Best) आर्थिक तोट्यात जात असतानाच केवळ प्रवासासाठी किमान भाडे पाच ते सहा रुपये आकारते हे सच्च्या मुंबईकराला पाहवत नव्हते. त्यामुळे कुठेतरी आपल्याच अंतर्मनातून आवाज येत असे, बेस्टने किमान भाडे दुप्पट करावे, काहीतरी पैसे वाढवायला हवे. त्यामुळे अखेर बेस्ट बसच्या प्रवास भाड्यात दुपटीने वाढ झाली. पण ही वाढ झाली असली तरी प्रत्यक्ष आकारणी अद्याप झालेली नाही. पण याच्या बातम्या आल्यानंतरही कुणी नागरिकांनी याविरोधात आवाज उठवला आहे किंवा भाडेवाढीला विरोध केला आहे असं काही पाहायला मिळालं का? तर नाही! कारण आज जनतेच्या मनाप्रमाणे बेस्टचे भाडे वाढलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलंही आहे. पण याला विरोध हा केवळ राजकीय पक्षांकडून होत आहे. कारण त्यांना बेस्ट (Best) राहिली काय आणि तिचे अस्तित्व संपले काय? त्यांना केवळ आपली राजकीय पोळी भाजून चमकून घ्यायचे आहे. भाडे वाढवले तरी हे विरोध करणार आणि नाही वाढवल्याने बेस्ट (Best) दिवाळखोरीत निघाली तरी विरोध करणार, त्यामुळे खरं तर असल्या बांडगुळांकडे लक्ष देण्याची गरज नाही. बेस्टला वाचवायचे असेल तर महसूल वाढीचे स्रोत निर्माण करायला हवेत.

(हेही वाचा – Warren Buffett : अब्जाधीश गुंतवणूकदार निवृत्त होणार, बर्कशायर हॅथवेच्या सीईओपदी कोण?)

आधीच निर्णय घ्यायला हवा होता

खरं तर बेस्टचे भाडे हे यापूर्वीच वाढवायला हवं होतं. २०१८ मध्ये जेव्हा किमान भाडे आठ, दहा आणि बारा अशाप्रकारे प्रस्तावित असताना केवळ पाच आणि सहा रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आणि पुढे ही भाडेवाढ केली जाऊ नये अशा प्रकारे प्रशासनावर दबाव आणला गेला. जर प्रत्येक वर्ष, दोन वर्षाला किमान एक रुपया जरी वाढ झाली असती तरी बेस्टला आर्थिक आधार मिळाला असता आणि नागरिकांच्या खिशावर एकदम भाडेवाढीचा भार पडला नसता. आज बेस्टच्या भाडेवाढीचा विरोध करणारी मंडळींनी शेअर रिक्षा आणि टॅक्सी यांनी एकदम पाच रुपयांची एक वाढ करून माणसी भाडे वाढवले तेव्हा कुठे विरोध केला का? ती खासगी सेवा असली तरी सार्वजनिक सेवा नाही का? जर त्यांनी भाडे वाढवले तर विरोध करायचा नाही आणि बेस्टने आपल्या बसचे भाडे वाढवल्यावर विरोधाचे झेंडे फडकायचे हा कुठला न्याय आहे? आपणच बघा ना जेवढे म्हणून शेअर रिक्षा आणि टँक्सी स्टँड आहेत ही प्रत्येक राजकीय पक्षांच्या युनियनची आहे? त्यातून त्यांना चार पैसे मिळतात म्हणून त्यांनी कितीही पैसे वाढवायचे आणि जनतेला लुटायचे आणि बेस्टने (Best) थोडे फार वाढवून आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला तर त्या विरोधात बोंबा ठोकायच्या? त्यामुळे खरोखरच राजकीय पक्षांना बेस्ट टिकली पाहिजे असे वाटते का? जर त्यांना असं वाटत असेल तर या भाडेवाढीला कुणीही विरोध करणार नाही, हे सत्य नाकारता येत नाही.

बेस्टला आर्थिक संकटाचा खाईत लोटले

२०१० मध्ये बेस्टकडे ४,३८५ मजबूत असा सार्वजनिक बसचा ताफा होता. पण हा ताफा घसरत आता ७०० ते ८०० वर आला आहे, तर भाडेतत्वावरील बसेसची संख्या वाढत आहे, पण त्यांच्याही बसेस बंद पडत असल्याने तसेच मोडीत निघणार असल्याने त्यांचीही संख्या कमी होवू लागली आहे. त्यामुळे बेस्टला स्वत:ला सक्षम होण्याची गरज आहे. आज जर आपण २०१८ मध्ये बेस्ट बसपासून मिळणारे उत्पन्न आणि होणारा तोटा लक्षात घेतला तर एक मुंबईकर म्हणून आपलीच आपल्याला लाज वाटेल. खरं तर मतांच्या बेरजेसाठी बेस्टला आर्थिक संकटाचा खाईत तत्कालीन सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) पक्षाने ढकललेले आहे याची खात्री पटेल. आज बेस्ट (Best) ही व्यावसायिक नफा कमावणारी संस्था नसून सेवा देणारी संस्था आहे हे जरी आपण बोलत असलो तरी किती तोट्यात जायला हवं आणि किती आणि कुणाकडून अनुदान प्राप्त व्हायला हवं हेही तेवढंच पाहिलं गेलं पाहिजे. सन २०१८ मध्ये जिथं बेस्टला उत्पन्नातून खर्च वगळता १०१२ कोटी रुपयांचा तोटा होता, तो तोटा २०२३-२४ मध्ये २,३३७ कोटी रुपयांवर जावून पोहोचला. म्हणजे तोटा तब्बल १,३०० कोटींनी वाढला. याच दरम्यान प्रवाशी संख्या वाढली, पण उत्पन्न वाढले का? आता आकडेवारीत सांगायचे झाले तर २०१८मध्ये प्रवाशांची संख्या होती २२ लाख १० हजार आणि त्यांच्या तिकीटातून महसूल प्राप्त झाला होता १,०३४ कोटी रुपये आणि २०२३-२४ मध्ये प्रवाशांची संख्या झाली २९ लाख ३५ हजार आणि त्यांच्या तिकीटातून प्राप्त होणारा महसूल हा ८४५ कोटी रुपये. म्हणजे प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी तिकीट दर कमी केला, पण या प्रवाशांची संख्या वाढवूनही २०१८च्या तुलनेत याचे उत्पन्न सुमारे २०० कोटींनी घटले. म्हणजे बेस्टची आर्थिक स्थिती काय आहे हे आपल्या लक्षात येईल. आज जर इतर महापालिकांच्या अखत्यारित येणाऱ्या परिवहन सेवा देणाऱ्या बसेसचे दर निश्चितच कमी आहे.

(हेही वाचा – India-Pakistan War : युद्ध झाल्यास चार दिवसही भारतासमोर टिकू शकत नाही पाकिस्तान !)

आज बेस्टने भाडेवाढ केली असली तरी यापूर्वीची म्हणजे पाच रुपयांचे भाडे हे पाच किलोमीटर अंतरासाठी होते. म्हणजे एका किलोमीटर अंतरासाठी केवळ १ रुपयेच ते आता दोन रुपये केले आहे. पण तोच जर इतर महापालिकांमध्ये आपण पाहिले तरी आपल्या लक्षात येईल बेस्ट (Best) किती कमी दरात बसची सुविधा देते. आज नवी मुंबईच्या एनएमटीच्या, ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये प्रति किलोमीटरसाठी सव्वा दोन आणि साडेतीन रुपये तिकीट आकारले जाते. मिरा भाईंदर महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये प्रति किलोमीटर तीन रुपये आकारले जाते, तर मग बेस्टनेच कमी का तिकीट आकारावे? आज नाही तर महानगर परिसरातील नागरिक नोकरी उद्योगानिमित्त मुंबईत येतात आणि बेस्टच्या सेवेचा लाभ घेतात. पण स्वत:च्या शहरात ते अधिक पैसे मोजतात पण बेस्टने पैसे वाढवले तर विरोध करायचा हे कुठल्या तत्वात बसते? कुणी म्हणते बेस्टला महापालिकेने अनुदान द्यायला हवे. खरंतर महापालिका (BMC) आपल्या कर्तव्यापेक्षा अधिक खर्च बेस्टवर करत आहे.

बेस्टला वाचवायला पाहिजे

आजवर सुमारे १३००० कोटी रुपये बेस्टला देण्यात आले आहेत. ही देण्यात येत असलेली रक्कम अनुदान आहे की परतफेडीवर आहे यावर निर्णय झालेला नाही. पण बेस्ट ही महापालिकेची अंगिकृत संस्था आहे, म्हणून महापालिका मदत करत आली आहे. पण बेस्ट (Best) जर महसूल वाढवण्याचा आणि काटकसरीचा काही प्रयत्नच करणार नसेल तर त्यांना किती दिवस पोसायचे आणि त्यांचा भार महापालिकेने का वाहायचा हाही प्रश्न आहे. आज बेस्टकडे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी द्यायला पैसे नाहीत, विद्युत विभागासाठी केबल आणि देखभालीची कामे द्यायला पैसे नाही. खासगी संस्थाकडून भाडेतत्वावर बसेस घेतल्या असल्या तरी त्यांची निष्ठा ही केवळ किलोमीटरशी असून त्यांना प्रवाशांशी काही देणे घेणे नाही. त्यामुळे बेस्ट (Best) थांब्यावर थांबत नाही, वेळेवर येत नाही अशा तक्रारी येत असल्या तरी आपली बेस्ट टिकली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला ही भाडेवाढ स्वीकारली पाहिजे. कारण ही भाडेवाढ आपण स्वीकारली तरीही बेस्ट नफ्यात येईल अशातला भाग नाही पण तोट्याचे प्रमाण कमी होईल, बेस्टच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी होईल. त्यामुळे प्रत्येकाने बेस्टमधून (Best) प्रवास करत एकप्रकारे बेस्टला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक मुंबईकराच्या हातभाराची गरज आहे!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.