मुंबईकरांनो, आणखी काही दिवस लोकल प्रवास विसरा!

108

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनचा निर्णय घेताना राज्य सरकारने मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या लोकलचा प्रवास सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंद केला. त्यामुळे आता पुन्हा सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार, असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मात्र मुंबई लोकलवर आणखी काही दिवस निर्बंध लावणे बंधनकारक असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सध्या तरी ठाकरे सरकार सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याच्या विचारत नसल्याचे दिसत आहे.

…म्हणून लोकल आणखी काही दिवस बंद राहणार!

मुंबईत लोकल बंद असल्यामुळे कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु आहे आणि त्याचा परिणाम दिसून येत आहे. मुंबई लोकलवर आणखी काही दिवस निर्बंध लावणे आवश्यक आहे. सरसकट सूट दिली, तर पुन्हा गर्दी होईल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी आणखी 15 दिवस तरी लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करता येणे शक्य नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

(हेही वाचा : अखेर वृक्ष छाटणीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणात मंजूर!)

तरच राज्यात निर्बंध मागे घेणार!

दरम्यान राज्यात १ जूनपासून काही गोष्टींवर निर्बंध मागे घेतले जाणार अशी चर्चा असून, विजय वडेट्टीवार यांनी देखील तसेच संकेत दिले आहेत. रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता असून, राज्यात सध्या 14 जिल्हे रेड झोनमध्ये असून रुग्णांचा आकडा बघून लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याच वडेट्टीवार म्हणाले. येत्या 5 ते 6 दिवसांत राज्यात काय परिस्थिती असेल याचा आढावा घेऊनच निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली. तसेच रेड झोन असलेल्या जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आठवड्याभरात आढावा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

टप्प्याटप्प्याने सुरु होणार

जरी १ जूनपासून निर्बंध शिथील झाले तरी ते टप्प्याटप्प्याने होणार आहेत. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. पूर्ण दिवस दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार व मद्यालय या सेवा सुरु करण्यात येतील. तर, चौथ्या टप्प्यात करोना परिस्थितीचा आढावा घेऊन सरकार मुंबई लोकल व धार्मिक स्थळांबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.