SRA Project : 86 रखडलेल्या प्रकल्पांकरिता नवीन विकासक नियुक्तीचा मार्ग मोकळा

58
SRA Project : 86 रखडलेल्या प्रकल्पांकरिता नवीन विकासक नियुक्तीचा मार्ग मोकळा
  • प्रतिनिधी 

मुंबई उपनगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) योजनांमध्ये मोठा निर्णायक बदल घडला आहे. रहिवाशांना भाडे न देणाऱ्या व काम थांबवलेल्या ८६ विकासकांचे अधिकार संपुष्टात आणण्यात आले असून, आता नागरिकांना नवीन विकासक नियुक्त करण्याचा मार्ग खुले झाला आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी एसआरए कार्यालयात भेट देत उपनगरातील रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी एसआरएचे सीईओ महेंद्र कल्याणकर व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी, रखडलेली कामे आणि भाडे न मिळाल्याची परिस्थिती शेलार यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. (SRA Project)

880 कोटींपैकी 601 कोटी वसूल, तरीही 279 कोटींचे भाडे थकित

मुंबईतील एसआरए योजनेतील रहिवाशांचे साल 2022 पासून 880 कोटी रुपये थकित भाडे विकासकांकडे होते. यापैकी 601.50 कोटी वसूल करण्यात आले असून, 279 कोटी रुपये अजूनही थकित आहेत. एसआरएने 86 रखडलेल्या प्रकल्पांतील विकासकांना कायदेशीर नोटिसा पाठवून त्यांचे अधिकार संपुष्टात आणण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामुळे आता या प्रकल्पांमध्ये नवीन विकासकांची नियुक्ती शक्य होणार आहे. (SRA Project)

दोन महिन्यांत 552 कोटींची वसुली, एसआरएचे शेलारांकडून कौतुक

शासनाच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे केवळ दोन महिन्यांत 552 कोटी रुपयांची वसुली झाली असून, याबद्दल पालकमंत्री शेलार यांनी एसआरएच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, “रहिवाशांची अडवणूक थांबवावी, आणि योजना लवकरात लवकर मार्गी लावाव्यात.” या भेटीत शेलार यांनी अभियंते, अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था तसेच नागरिकांसाठीची आसन व्यवस्था याचीही पाहणी केली व आवश्यक बदलांचे निर्देश दिले. (SRA Project)

वांद्रेतील बाधित 104 रहिवाशांपैकी 24 जणांना घरांच्या चाव्या वाटप

वांद्रे स्मार्ट सिटी अंतर्गत वांद्रे पूर्व येथे न्यायालयासाठी दिलेल्या जागेमुळे बाधित झालेल्या 104 रहिवाशांना शासनाकडून घरे देण्यात आली आहेत. आज त्यापैकी २४ रहिवाशांना पालकमंत्री शेलार यांच्या हस्ते घरांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. रखडलेल्या झोपु योजनांमध्ये नवसंजीवनी निर्माण करणारा निर्णय, भाडे थकवणाऱ्या विकासकांवर ठोस कारवाई, आणि नवीन विकासकांच्या नियुक्तीसाठी मोकळा मार्ग – मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नांना आता मिळणार नवी गती! (SRA Project)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.