-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
माटुंगा, दादर परिसरासह शीव परिसरात पाणी तुंबण्यास कायरणीभूत ठरणाऱ्या दादर धारावी नाल्याच्या सफाईचे काम यंदा पूर्ण झाले नसून पहिल्याच पावसात दादर – माटुंगा परिसराची सफाईच न झाल्याने येथील सुमारे ४५० हून कुटुंबांची वस्ती असलेल्या कमला रामनमधील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. या परिसरातून जाणाऱ्या नाल्याची सफाईच यंदा झालेली नसून महापालिकेचे अधिकारी मात्र मोठ्या भरतीचे कारण देत आपले हात वर करताना दिसत आहे. त्यामुळे आधीच नाल्यातील गाळ पावसामुळे वाहून गेला आणि त्यातच न केलेल्या कामाचे खापर समुद्राच्या मोठ्या भरतीवर फोडून अधिकाऱ्यांनी आपली सुटका करून घेण्यास सुरुवात केल्याचे पहायला मिळत आहे. (Mumbai Rain)
दादर धारावी नाला हा दादर पश्चिम रेल्वे स्थानकापासून वाहत जाऊन माटुंगा पश्चिम रेल्वे वसाहत, कमला रामन वसाहत, माटुंगा वर्कशॉपला जोडून पुढे हा नाला माहिम आझाद नगर येथून पुढे शाहू नगर, धारावी ६० फुटी रस्त्यालगत असणाऱ्या नाल्याला जावून तिथून खाडीला मिळतो. माटुंगा वर्कशॉप समोरील मध्य रेल्वे वसाहतीच्या प्रारंभी या नाल्यात गेट बसवण्यात आले असून या नाल्याचा एक मार्ग पश्चिम रेल्वेच्या रुळाखालून सेनापती बापट मार्गाच्या दिशेने जातो. त्यामुळे नाला तुंबल्यास या दादर ते माटुंगा आणि माहिमला जोडणारा सेनापती बापट मार्ग पाण्याखाली जातो. तसेच रेल्वे मार्गही पाण्याखाली जातो. (Mumbai Rain)
या नाल्याच्या शेजारी माटुंगा रोड रेल्वे स्थानकाच्या समोरील भागात सुमारे ४०० कुटुंब वस्ती असलेल्या कमला रामन नगर ही मोठी वसाहत असून पुढे आझाद नगर, मेघवाडी या मोठ्या वस्त्या आहेत. परंतु या दादर धारावी नाल्याची सफाई पूर्णपणे झालेली नसल्याने यंदा पहिल्याच पावसात कमला रामन नगर येथील भागांमध्ये साचून लोकांच्या घरादारांमध्ये पाणी शिरले. सकाळीच लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाले आणि प्रत्येकाच्या घरांमध्ये एक फुट एवढे पाणी जमा झाले होते. या नाल्यातील याच पट्ट्यातील सफाई झालेली नसून एकदा दादरच्या दिशेने पोकलेन मशिन नाल्यात उतरवली गेली, पण ती मशिन काही पुढे सरकली गेली नाही आणि माटुंगाच्या दिशेने रोबोही उतरवला गेला पण एकाच जागेवर दहा ते बारा दिवस उभा करून तोही बाहेर काढला गेला. त्यामुळे या नाल्यातील सफाईचे काम झालेलेच नसून पावसाच्या पाण्याने आतील प्रवाह सुरळीत असल्याचे दाखवून यातील सफाई झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. त्यातच भरती आणि पाऊस एकाच वेळेला असल्याने अधिकाऱ्यांकडून नाल्यातील पाण्याचा निचरा भरतीमुळे होत नसल्याचे सांगून न झालेल्या सफाईचे पाप झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Mumbai Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community