Mumbai Rain : आयुक्तांनी पावसाळ्यात तुंबणाऱ्या ‘त्या’ ठिकाणांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले हे आदेश

977
Mumbai Rain : आयुक्तांनी पावसाळ्यात तुंबणाऱ्या 'त्या' ठिकाणांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले हे आदेश
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

सखल भागातील पावसाळी पाणी उपसणारी यंत्रणा अधिक प्रभावी असावी. हिंदमाता, गांधी मार्केट येथील उदंचन केंद्रांची क्षमता अधिक परिणामकारक पद्धतीने कार्यरत ठेवावी. चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचू नये आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये, याची दक्षता बाळगावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. (Mumbai Rain)

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेच्‍या पर्जन्‍य जलवाहिनी विभाग आणि रस्ते व वाहतूक विभागामार्फत मुंबईत विविध कामे सुरू आहेत. या अनुषंगाने, जोरदार पावसावेळी शहर विभागातील हिंदमाता, गांधी मार्केट आणि पूर्व उपनगरांतील चुनाभट्टी रेल्‍वे स्‍थानकाजवळील पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांची तसेच रस्ते काँक्रिटीकरण कामांची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी ३ जून २०२५ रोजी पाहणी केली. तसेच, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक ते निर्देश दिले. (Mumbai Rain)

(हेही वाचा – महापालिका निवडणुकीची Shiv Sena कडून जोरदार तयारी! ‘जनता दरबार’ मोहिमेची रणनीती)

भूषण गगराणी यांनी दादर येथील हिंदमाता आणि शीव (सायन) येथील गांधी मार्केट येथील जल साठवण टाकी, उपसा संच, मुख्य जलवाहिनी आणि साठवण प्रक्रियेचा आढावा घेतला. गगराणी म्‍हणाले की, हिंदमाता आणि गांधी मार्केट उदंचन केंद्राचे परिचलन अधिक परिणामकारक व्हावे, यासाठी अधिक दक्ष रहावे. या ठिकाणी ‘फ्लो मीटर’ बसवावेत. सर्व पंपांची क्षमता एकसमान करावी. आपत्‍कालीन समयी अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे, उदंचन संच बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनित्र (जनरेटर) संच तातडीने उपलब्ध करून द्यावेत. (Mumbai Rain)

पावसाच्‍यावेळी उदंचन केंद्र यंत्रणा पुरेशा क्षमतेने आणि वेळेत कार्यान्वित करावे. उदंचन केंद्र परिचालकांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून पावसाचा नियमितपण अंदाज घ्यावा. अधिकाऱ्यांनी यंत्रणेला वेळोवेळी सतर्क करावे. चुनाभट्टी रेल्‍वे स्‍थानकाजवळील नाल्यांची व्यवस्थित स्वच्छता करावी. उदंचन संच बंद पडला तर पर्याय म्हणून दुसरा संच तातडीने तैनात ठेवावा. तातडीच्या प्रसंगी या पर्यायी व्यवस्थेचा प्रतिसाद कालावधी जलद असावा, असे निर्देश गगराणी यांनी दिले. (Mumbai Rain)

New Project 2025 06 03T181240.008

(हेही वाचा – देशाने भगवान श्रीकृष्ण आणि Veer Savarkar यांच्या विचारांवर चालणे गरजेचे; मंजिरी मराठे यांचे आवाहन)

भूषण गगराणी यांनी शीव (सायन) येथील जैन सोसायटी मार्ग, दादर येथील परळचा राजा मार्ग या सिमेंट काँक्रिट रस्‍ते कामांची देखील पाहणी केली. परळ येथील एफ दक्षिण विभाग कार्यालयातील आढावा बैठकीनंतर गगराणी यांनी नागरी सुविधा केंद्रास भेट दिली. तसेच, नागरिकांशी संवाद साधला. रस्ते काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाल्यावर रस्तारोधक (बॅरिकेडस्) काढले आहेत का, उर्वरित बांधकाम साहित्य तसेच राडारोड्याची विल्हेवाट लावली आहे का, पदपथ सुस्थितीत आहेत का याची अधिकाऱयांनी पाहणी करुन खातरजमा करावी असे निर्देश देखील गगराणी यांनी दिले. प्रशासकीय विभागांच्‍या सहायक आयुक्त यांनी नियमितपणे नागरी सुविधा केंद्रास भेट देऊन कामकाजाचा आढावा घ्यावा, अशी सूचना गगराणी यांनी केली. याप्रसंगी उप आयुक्त (परिमंडळ ५) देविदास क्षीरसागर, एल विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर, एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अरुण क्षीरसागर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Mumbai Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.