मुंबईत Zomato सेवेत महापालिका उतरवणार बचत गटांच्या महिलांना; प्रायोगिक तत्वावर ‘टी’ विभागापासून सुरुवात

1571
मुंबईत Zomato सेवेत महापालिका उतरवणार बचत गटांच्या महिलांना; प्रायोगिक तत्वावर ‘टी’ विभागापासून सुरुवात
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महानगरपालिका आणि घरोघरी खाद्यपदार्थ पोहोच करणारी ‘झोमॅटो’ (Zomato) कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आर्या’उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार आता खाद्य पदार्थ वितरणाच्या क्षेत्रातही महिला बचत गट आपला ठसा उमटविणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. कौतुकाची बाब म्हणजे ‘झोमॅटो’सोबत महिला बचत गटांसाठी अशाप्रकारे उपक्रम राबविणारी महानगरपालिका ही भारतातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे. त्यामुळे झोमॅटोच्या सेवेत जिथे पुरुषांची मक्तेदारी आहेत, त्या सेवेत आता बचत गटांच्या माध्यमातून महिलाही स्वार झालेल्या दिसणार आहेत.

‘प्रोजेक्ट आर्या’चा शुभारंभ बुधवारी ५ मार्च २०२५ पासून करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते तसेच संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, झोमॅटोचे (Zomato) मुंबई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश आहुजा यांच्या उपस्थितीत मुलुंड (पश्चिम) येथील कालिदास नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. या उपक्रमासाठी एकूण ३० ते ४० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५ महिलांची निवड करण्यात आली आहे. आता या महिला खाद्य पदार्थ पोहोचविण्याचे काम करणार आहेत.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया ऑल आऊट; भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य)

बचत गट म्हटले की, लोणची, पापड तयार करणे, कापडी पिशव्या तयार करणे, सजावटीची साहित्य तयार करणे अशी कामे आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र आता ही पारंपरिक चौकट ओलांडून महिलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्टया अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईतील धावते आयुष्य, बदलती जीवनशैली, वेळेची कमतरता, नोकरी-व्यवसायामुळे होणारी फरफट यामुळे अनेकांना पोटपूजा करण्यासाठी विविध उपाहारगृहे, भोजनालय, खानावळी यावर निर्भर राहावे लागते. साहजिकच अशाप्रकारे खाद्यपदार्थ कार्यालयात, घरी उपलब्ध झाल्यास अनेकांची सोय होते. या क्षेत्रात आता अनेक व्यावसायिक कंपन्या सेवा देतात. त्यातील नामांकीत असलेल्या झोमॅटो (Zomato) कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेने बचत गटाच्या महिलांसाठी ‘प्रोजेक्ट आर्या’सुरू केला आहे.

महिलांना दिले दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण

खाद्यपदार्थ वितरणात आतापर्यंत पुरुषांचीच संख्या अधिक आढळते. हीच बाब अधोरेखित करून मुंबई महानगरपालिकेने यासाठी बचत गटाच्या ३० ते ४० महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच स्व:रक्षणाचे धडे दिले आहेत. यासोबतच मोबाईल अॅपद्वारेही या महिला प्रसंगी गरज भासल्यास आपल्कालीन संदेश (एसओएस) पाठवून स्वत:चे रक्षण करू शकणार आहेत.

(हेही वाचा – आधी औरंगजेबाचे उदात्तीकरण, मग माघार; Abu Azmi नरमले)

भारतातील पहिलीच महानगरपालिका

झोमॅटोसोबत (Zomato) अशाप्रकारचा उपक्रम राबविणारी महानगरपालिका ही भारतातील पहिलीच महानगरपालिका आहे. याउपक्रमांतर्गत दुर्बल घटकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध संकल्पना राबविण्यात येणार आहेत. सुरुवातीला महानगरपालिकेच्या टी विभागात म्हणजेच मुलुंड परिसरात हा उपक्रम सुरू होत आहे. यानंतर इतर सर्व विभागांमधील (वॉर्ड) बचत गटातील महिलांनाही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या स्वयं सहायता समुहाच्या माध्यमातून हा उपक्रम पार पाडण्यात येणार आहे.

सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती

प्रोजेक्ट आर्यामध्ये सहभागी महिलांना नोंदणी प्रक्रिया, प्रशिक्षण, सुरक्षा उपायबाबतच्या योजना आणि विमा सुविधा झोमॅटोकडून प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती, अपघात विमा, मातृत्व विमा, कुटुंबासाठी विमा, मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांसाठी रजा, नि:शुल्क सुरक्षा साहित्य, कुटुंबासाठी आदी बाबींचा समावेश आहे. सध्या मुलुंड (टी वॉर्ड) येथे इच्छुक महिलांकरीता झोमॅटो अॅपवर नोंदणीसाठी प्रशिक्षण सत्रे आणि इलेक्ट्रिक दुचाकी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात आहेत, अशी माहिती संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.