महापालिका शाळांमधील प्रत्येक शिक्षकांवर दहा नवीन प्रवेशाचे लक्ष्य

83

‘मुंबई पब्लिक स्कूल’मध्ये प्रवेश घेतलेली बालके ही शाळेच्या शेवटच्या इयत्तेपर्यंत आपल्याच शाळेत राहतील, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी शाळेची असणार आहे. प्रत्येक शाळेतून जितके दाखले जातील, तितके नवीन प्रवेश करून घेण्याचीही जबाबदारी शाळा प्रमुखांची असेल. त्यामुळे प्रत्येक शिक्षकांना शाळा स्तरावर किमान दहा नवीन प्रवेशाचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याच्या अखत्यारीतील शाळांचे नामकरण ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे करण्यात आले आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधिकारी वर्गाने एकसंघ भावनेतून केलेल्या कामामुळे मुंबई पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी पटसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. पटसंख्या वाढीचा आलेख असाच उंचावण्यासाठी २० मार्च २०२३ पासून ‘मिशन अॅडमिशन, एकच लक्ष्य-एक लक्ष्य’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. यंदा १ लाख वाढीव प्रवेश देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इयत्ता पहिली, पाचवी आणि नववीत वर्गोन्नतीने आलेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ करण्याचे नियोजन आहे.

येत्या ५ ते ३० एप्रिल दरम्यान पटनोंदणी मोहीम

महानगरपालिकेच्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’मध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढीचा आलेख उंचावत असून यंदा ‘मिशन ऍडमिशन, एकच लक्ष्य-एक लक्ष’ ही मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. तर येत्या ५ एप्रिल २०२३ पासून ३० एप्रिल पर्यंतच्या कालावधी दरम्यान पटनोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सह आयुक्त अजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या या पटनोंदणी मोहिमेत मागील वर्षाच्या पटसंख्येच्या तुलनेत एक लाख वाढीव प्रवेश देण्याचे उद्दिष्ट्य निर्धारित करण्यात आले आहे. नियमित व प्रचलित पद्धतीने शाळा प्रवेश देण्याबरोबरच यंदा क्युआर कोड, ऑनलाइन लिंक याद्वारेही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याचबरोबर या अनुषंगाने काही समस्या उद्भवल्यास त्याचे तात्काळ निवारण करता यावे, यासाठी हेल्पलाइन क्रमांक देखील कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली आहे.

(हेही वाचा दिल्लीत शिवरायांचे स्मारक उभारा; उदयनराजे भोसले यांची अमित शाह यांच्याकडे मागणी )

मुंबई पब्लिक स्कूलमध्ये बालवाडी, अंगणवाडीचे प्रवेश 

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या पूर्व प्राथमिक (बालवाडी), प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमीळ, तेलगू, कन्नड आणि गुजराती अशा आठ भाषिक माध्यमांच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिले जाते. महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या बालवाडीतील तसेच अंगणवाडीतील सर्व बालकांचे प्रवेश ‘मुंबई पब्लिक स्कूल’मध्ये करण्याची जबाबदारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, विभाग निरीक्षक आणि प्रशासकीय अधिकारी (शाळा) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

अशाप्रकारे घेऊ शकतात पाल्याचा शाळेत प्रवेश

मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी तीन प्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये पाल्याचे नाव, पालकांचा मोबाईल क्रमांक, प्रवेशाचे ठिकाण, प्रवेशाची इयत्ता व प्रवेशाचे माध्यम इत्यादी बाबींचा समावेश आहे. याद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे संबंधित पाल्याच्या प्रवेशाची माहिती परिरक्षित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेला ‘क्युआर कोड’ स्कॅन करून पालकांना शाळा प्रवेशासाठी मुलभूत माहिती भरून प्रवेश घेता येईल. तसेच http://bit.ly/bmc_mission_admission _2023-24 या लिंकवर क्लिक करून मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पाल्यांचा प्रवेश निश्चित करता येईल. याखेरीस शाळा प्रवेशासाठी ७७७७-०२५-५५७५ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते ५ या वेळेत व्हॉट्सअप मेसेजद्वारे शाळा प्रवेशाची माहिती घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.