BMC : मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा महापालिका आयुक्तांना पडला विसर; अभियंत्यांमध्ये पसरली नाराजी

304
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्तांची पदे ५० टक्के पदे ही कार्यकारी अभियंता संवर्गातील अभियंत्यांना पदोन्नतीने भरण्याची अभियंता संघटनांची मागणी मान्य करत महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबतचे आश्वासनही दिले. परंतु या आश्वासनाचा विसरच आता महापालिका प्रशासकांना पडला असून प्रत्यक्षात कार्यकारी अभियंत्यांमधून सहायक आयुक्तांची पदे भरण्याबाबतचा कोणताही निर्णय अद्यापही प्रशासकांना घेता आलेला. त्यामुळे अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मुंबई महानगरपालिकेतील सहायक आयुक्त पदे १०० टक्के लोकसेवा आयोगामार्फत भरली जात आहेत याला अभियंता संघटनानी विरोध दर्शवला आहे. त्यातील ५०टक्के पदे ही कार्यकारी अभियंता संवर्गातील अभियंत्यांना पदोन्नतीने द्यावीत अशी अभियंता संघटनानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभियंता दिनी आयोजित कार्यक्रमात केली होती. यावेळी उपस्थित महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांना मुख्यमंत्र्यांनी याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते आणि यावर आयुक्त चहल यांनी ही मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत कार्यकारी अभियंता पदावरील अभियंत्यांद्वारे पदोन्नतीने हे पद भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.

(हेही वाचा Devendra Fadanvis : फडणवीसांनी सांगितला २०१९मधील घटनाक्रम; म्हणाले उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची घेतली खोटी शपथ)

१९८४ पूर्वी महानगर पालिकेतील दहा पंधरा वर्ष सेवा झालेल्या अनुभवी अभियंता आणि अधिकाऱ्याची पालिका आयुक्त विभाग अधिकारी पदावर नेमणूक करीत असत आणि त्यांनी यशस्वीपणे विभाग पातळीवर काम केलेले आहे. आज विभाग पातळीवर विभाग अधिकारी म्हणुन अभियंते यशस्वी पणे काम करीत आहेत आणि हे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त मान्य करीत असत असे बृहन्मुंबई महानगर पालिका इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष तसेच यशवंत धुरी यांनी स्पष्ट केले. विभाग कार्यालयाच्या हद्दीतील ८० टक्के नागरी  सेवा या अभियांत्रिकी स्वरूपाच्या असून त्याची जबाबदारी  विभागातील अभियंत्यांच्या वर आहे. अशावेळी त्यांच्या कामाचे स्वरूप समजून घेणे आणि त्यातील त्रुटी दूर करणे यासाठी विभाग अधिकारी पदावर जर अनुभवी अभियंता असेल ते काम फार सोपे होते. याबाबत प्रत्यक्ष  लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. विभागांतील प्रशासकही अनुभवी असावा, तो नुकताच नियुक्त झालेला नवखा नसावा असेही त्यांनी म्हटले आहे.

महानगरपालिकेतील सहायक आयुक्त हे विभाग कार्यालयातील सुमारे १७  वेगवेगळ्या उपखात्यातील कामांवर देखरेखीचे आणि नियंत्रित करण्याचे काम करतात, त्या खात्यातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी ते स्वीकारत नाहीत, नुकत्याच एच -पूर्व विभागातील अभियंत्यांना झालेल्या मारहाणीच्या वेळी हे दिसून आले  यावरही त्यांनी अधोरेखित केले आहे. सहायक आयुक्त यांनी वॉर्डातील होणाऱ्या प्रत्येक घटनेची जबाबदारी स्वीकारून आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले पाहिजे,  पण ते काम ते करीतच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आयुक्तांना सुलभपणे काम करण्यासाठी  कार्य कुशल आणि तज्ञ अधिकाऱ्यांची गरज आहे. नागरिकांच्या समस्या उत्तमपणे सोडविणारे हाताळणारे विभाग अधिकारी हवेत, आज होणाऱ्या वाढत्या अनधिकृत बांधकामांना रोखणारे तडफदार अधिकारी हवेत . आणि यासाठीच पन्नास टक्के जागावर कार्यकारी अभियंत्याना नियुक्त करावी अशी मागणी सर्व अभियंता संघटनांची असून खुद्द आयुक्तांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांच्यासमोर मान्य केली आहे, असे म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.