-
प्रतिनिधी
मुख्यमंत्री सहायता निधीच्या (Mukhyamantri Sahayata Nidhi) सर्व सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य शासनाने मेटासोबत सामंजस्य करार केला असून, त्याद्वारे ही सुविधा लवकरच लागू होईल. तसेच, आरोग्यविषयक सर्व योजनांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याचेही निर्देश त्यांनी दिले. यामुळे नागरिकांना वैद्यकीय मदत सहज मिळेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री सहायता निधीच्या (Mukhyamantri Sahayata Nidhi) सर्व सेवा व्हॉट्सअॅपद्वारे सहज उपलब्ध होतील. यामुळे रुग्णसेवा अधिक लोकाभिमुख होईल.”
(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack नंतर सुप्रीम कोर्टात जनहित याचिका; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी)
निधी वाढीसाठी ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मधून फंडिंग मिळवण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. ही संस्था मुख्यमंत्री सहायता निधी आणि सीएसआर यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करेल. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून सेवा अधिक प्रभावी करण्याचेही निर्देश फडणवीस यांनी दिले. “रुग्णसेवेतील अडचणी दूर करून निधीचा जास्तीत जास्त उपयोग करावा. यासाठी रुग्णालयांची संलग्नता वाढवून अधिक रुग्णालये पॅनल करावीत,” असे ते म्हणाले.
एकीकृत पोर्टल आणि पारदर्शकता
मुख्यमंत्री सहायता निधी (Mukhyamantri Sahayata Nidhi), महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनांच्या लाभाची माहिती एकाच पोर्टलवर उपलब्ध करावी, असे निर्देश देण्यात आले. यात रुग्णाला मिळालेला लाभ, आजार आणि खर्चाची माहिती पारदर्शकपणे नोंदवली जाईल. तालुकानिहाय रुग्णमित्र नेमून, सुधारित पोर्टल, टोल-फ्री क्रमांक आणि जियो-टॅगिंगद्वारे रुग्णांना जवळचे रुग्णालय शोधण्याची सुविधा देण्याचेही निर्देश देण्यात आले.
३१ मार्च २०२५ पर्यंत ७,६५८ रुग्णांना ६७ कोटी ६२ लाख ५५ हजार रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती रामेश्वर नाईक यांनी दिली. या नव्या उपाययोजनांमुळे वैद्यकीय मदत प्रक्रिया अधिक गतिमान आणि सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community