ओव्हर स्पीडबद्दल MSRTC च्या चालकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल

89

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आर.टी.ओ. ने घालून दिलेली ताशी ८० किलो मीटर व घाट सेक्शनमध्ये ताशी ४० किलोमीटरची वेग मर्यादा ओलांडल्याबद्दल बऱ्याच एसटी (MSRTC) वाहनांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत लाखो रुपयांच्या दंडाच्या रक्कमेची वसुली सदर वाहन चालविणाऱ्या चालकाच्या पगारातून  करण्यात आली आहे. विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना ठरवून दिलेल्या वेळेत उचित स्थळी पोहचविण्यासाठी किंवा रस्त्यातील वाढलेल्या वाहतुकीचा विचार करून वेग मर्यादा किंचित वाढल्यास एसटी (MSRTC) ही सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी संस्था असल्याने एसटीच्या वाहनाला दंडाच्या रक्कमेत शिथिलता देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी (MSRTC) बस हे प्रवासी वाहतूक करणारे वाहन असून कुठलही अनुचित घटना घडू नये यासाठी बसेस ८० वेग मर्यादेवर लॉक केलेल्या आहेत. एसटीची सुटण्याची व पोचण्याची वेळ ठरवून दिलेली असते. कितीही वाहतूक कोंडी असली तरीही प्रवाशांना ठरवून देण्यात आलेल्या वेळेत उचित स्थळी पोहोचवायचे असते. काही प्रवाशांचा तर तिथून पुढचा प्रवास रेल्वे, बस, छोटी वाहने व विमानाचा असतो अशा वेळी विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना विनंतीवरून रस्त्यावरची स्थिती बघून लेन कटिंग करून पुढे जावे लागते. कधी कधी रुग्ण प्रवाशांना तसेच रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांना त्यांनी केलेल्या विनंती वरून  एसटी (MSRTC) ही प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन मार्गक्रमण करीत असल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून उचित स्थळी पोहोचवायचे असते. त्याच प्रमाणे एसटीच्या चालकांनी गर्भवती महिलांना सुद्धा वेळेत रुग्णालयात दाखल केल्याच्या घटना सुद्धा समाजमाध्यमांवर गर्वाने व कौतुकाने सांगितल्या जातात.

(हेही वाचा Fake call center : पुण्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, परदेशी नागरिकांना धमकावून कोट्यवधींची फसवणूक उघडकीस)

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वेग मर्यादा घालून देण्याचा सरकारचा नियम योग्य असला तरी मानवतेचा व रस्त्यावरील परिस्थितीचा तसेच एसटीच्या एकंदर सेवेचा विचार केल्यास त्यात वेग मर्यादेत किंचित वाढ झाल्यास एसटीच्या (MSRTC) वाहनाला शिथिलता देण्यात आली पाहिजे कारण सुरक्षिततेच्या एकूण आकडेवारीचा विचार केल्यास आजही एसटी सर्वात अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे. एकंदर सेवेचा विचार करून एसटीच्या वाहनाला विशिष्ट परिस्थितीत वेग मर्यादेत शिथिलता देण्यात यावी. या विषयावर आर टी ओ व एसटीचे व्यवस्थापन यांच्यात चर्चा झाली पाहिजे व निश्चित धोरण ठरविण्यात आले पाहिजे एसटीकडून असा दंड वसूल करताना तिच्या सेवेचा व यापुढे चालकांच्या पगारातून अशी वसुली करताना त्यांच्याही आर्थिक स्थितीचा सहानुभूती पूर्वक विचार करण्यात आला पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.

या शिवाय घाट सेक्शनमध्ये चढाला व उताराला एसटीच्या वाहनाची वेग मर्यादा कमी करण्याचा प्रयत्न केला तरी मागे व पुढे असलेल्या वाहनांमुळे ते कधी कधी शक्य होत नाही.अश्या वेळी रस्त्यावरची पुढची स्थिती बघून वाहन चालवावे लागते. त्यामुळे उतार व चढाला एसटी हे शासकीय वाहन असल्याने त्याची वेग मर्यादा ताशी ४० किमी ऐवजी किंचित वाढल्यास दंड वसूल करण्यात येऊ नये. त्याच प्रमाणे आता पर्यंत एसटीकडून लाखो रुपयांची दंड वसुली करण्यात आली असून  एकवेळची बाब म्हणून ही दंडाची रक्कम एसटीला परत देण्यात यावी अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.