जास्त वाहने आणि अधिक आकारले जात होते पैसे; फोर्ट परिसरातील वाहनतळावर BMC ने केली कडक कारवाई

76
जास्त वाहने आणि अधिक आकारले जात होते पैसे; फोर्ट परिसरातील वाहनतळावर BMC ने केली कडक कारवाई
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

काळाघोडा परिसरात निश्चित करण्यात आलेल्या शुल्कापेक्षा अधिक वाहनतळ शुल्क आकारणी करणाऱ्या सशुल्क वाहनतळाशी संबंधित संस्थेवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, वाहनधारकांकडून अनधिकृतपणे शुल्क वसूली करणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ विभागातील काळाघोडा परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरी आणि व्ही. बी. गांधी मार्ग येथे एकूण १०० चारचाकी तसेच ४५ दुचाकी वाहनांसाठी सशुल्क वाहनतळाचे कंत्राट संस्थेला देण्यात आले आहे. दुचाकी वाहनासाठी प्रति तास २० रुपये आणि चारचाकी वाहनासाठी प्रति तास ७० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. पण, महानगरपालिकेने कंत्राटात निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा या संस्थेचे प्रतिनिधी अधिक शुल्क आकारणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. (BMC)

(हेही वाचा – BMC च्या माध्यमिक शाळांचा SSC चा निकाल ९२.९२ टक्के; ८९ शाळांचा निकाल १०० टक्के)

याच पार्श्वभूमीवर, महानगरपालिका उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या नेतृत्वात कारवाईचे नियोजन करण्यात आले. या संस्थेकडून होत असलेल्या फसवणुकीची शहानिशा करण्यासाठी काळा घोडा परिसरातील वाहनतळाच्या ठिकाणी ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यात आले. अन्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वत:ची ओळख पटू नये, या पद्धतीने खासगी वाहनांचा वापर करत हे ‘स्टींग ऑपरेशन’ केले. या संस्थेचे प्रतिनिधी याठिकाणी येणाऱ्या चारचाकी वाहनधारकांकडून प्रति वाहन प्रति तास ७० रुपयांऐवजी १५० रुपये शुल्क घेत असल्याचे आढळून आले. याठिकाणी महानगरपालिकेने लावलेले ‘नो पार्किंग’चे फलक झाकून त्याठिकाणी संस्थेकडून वाहने उभी करत असल्याचे तसेच, संस्थेचे प्रतिनिधी गणवेश आणि अधिकृत ओळखपत्र धारण करत नसल्याचेही यावेळी निदर्शनास आले. (BMC)

(हेही वाचा – Doha Diamond League : दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रासह भारताचे ४ भालाफेकपटू खेळणार)

या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या ‘ए’ विभागाच्या वतीने सदर संस्थेला ९ मे २०२५ रोजी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. तसेच, निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारणी करुन वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक केल्याबद्दल १० हजार रुपये, निर्देशित जागेऐवजी ‘नो पार्किंग’ क्षेत्रात वाहने उभी करुन शुल्क आकारणी केल्याबद्दल ४ हजार रुपये आणि प्रतिनिधींनी गणवेश तथा अधिकृत ओळखपत्र धारण न केल्याबद्दल १ हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. संस्थेचे प्रतिनिधींविरोधात माता रमाबाई मार्ग पोलिस स्थानकात प्रशासनाकडून लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सशुल्क वाहनतळाच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेल्या फलकावर उल्लेखित शुल्कापेक्षा अधिक वाहनतळ शुल्क आकारणी केली जात असेल. संबंधित वाहनतळासंदर्भात काही सूचना किंवा तक्रारी असतील तर संबंधित विभाग कार्यालयाकडे तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.