Western Express Way वर मायक्रो सरफेसिंगचा प्रयोग यशस्वी; इतर डांबरी रस्त्यांवर ‘या’ तंत्रज्ञानाचा होणार वापर

रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (Western Express Way) डांबरी पृष्ठभागाची परिणामकारक डागडुजी तथा दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे खराब झालेल्या काँक्रिट पृष्ठभागाच्या देखभालीसाठी नवीन दृष्टीकोन आणि नवीन तंत्रज्ञान आवश्यक होते.

2290

मुंबई महापालिकेला हस्तांतरीत झालेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गाची (Western Express Way) वाहतूक सुधारणा करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात असून या रस्त्याचा भाग खराब होवून भविष्यात तिथे खड्डे सदृश्य स्थिती निर्माण होवू नये आणि रस्त्याचे आयुर्मान वाढावे यासाठी प्रायोगिक तत्वावर मायक्रो सरफेसिंग तत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून याच्या यशस्वी प्रयोगानंतर मुंबईतील अनेक जुन्या रस्त्यांवर याचा वापर केला जाणार आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्ग (Western Express Way) आणि पूर्व द्रुतगती महामार्ग हे एमएमआरडीएने पुढील सुधारणा आणि देखभाल करण्यासाठी नोव्हेंबर २०२२मध्ये महापालिकेला हस्तांतरीत झाला. रस्ता हस्तांतरीत झाल्यानंतर दोन्ही मार्गावरील पावसाळापूर्व प्रतिबंधक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली होती. आता पश्चिम द्रुतगती मार्गावरील (Western Express Way) डांबराचा पृष्ठभाग बऱ्याच ठिकाणी खराब तथा जीर्ण झाल्याने सुरळीत वाहतूक होत नाही. त्यामुळे जिथे अशाप्रकारे खराब पृष्ठभाग असेल तेथील वरील दोन्ही थर हे मायक्रोसरफेसिंग तंत्रज्ञान वापरुन सुधारण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच जिथे ओबडधोबड तथा असमतल पातळीवर असलेला पृष्ठभाग हा समपातळीवर आण्याचा प्रयत्न या नवीन तंत्रज्ञानाद्वारे केला जात आहे.

(हेही वाचा Infiltrators : घुसखोरांपासून देश सुरक्षित करण्यासाठी येणार नवा कायदा? काय आहेत वैशिष्ट्ये?)

रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (Western Express Way) डांबरी पृष्ठभागाची परिणामकारक डागडुजी तथा दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे खराब झालेल्या काँक्रिट पृष्ठभागाच्या देखभालीसाठी नवीन दृष्टीकोन आणि नवीन तंत्रज्ञान आवश्यक होते. त्यामुळे प्रथम डांबरी पृष्ठभाग सुधारणासाठी मायक्रो सरफेसिंग हे तंत्रज्ञान प्रायोगिक तत्वावर वापरण्याचा निर्णय घेतला. या तंत्रज्ञानाद्वारे रहदारीच्या वेळात कमी वेळात डांबरी पृष्ठभागाच्या सुधारणेचे काम करून रहदारी लवकरात लवकर पूर्वव्रत करणे शक्य होत आहे. अवध्या दोन तासांमध्ये वाहतुकीसाठी रस्ता खुला करता येतो.

पूर्व द्रुतगती महामार्गावर (Western Express Way) या तंत्रज्ञानाची चाचणी केल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावर या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मायक्रोसरफेसिंगची तंत्रज्ञानाची किमान जाडी सुमारे ०६ मिमी  एवढी असून या तंत्रज्ञानाच्या यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबईतील इतर डांबरी रस्त्यांची सुधारणा करण्याचा विचार सुरु आहे. पश्चिम उपनगरातील रस्त्यांवर या तंत्रज्ञानाद्वारे सुधारणा करण्यासाठी तब्बल २० कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने ऑक्टोबर २०२४ रोजी मंजुरी दिली आहे. याबाबत रस्ते प्रमुख अभियंता गिरीष निकम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मागील पावसाळ्यात पश्चिम उपनगरातील काही भागांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून हा प्रयोग यशस्वी झाल्याचे म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.