- मुंबई (विशेष प्रतिनिधी)
म्हाडाच्या (MHADA) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणातील ९६ अतिधोकादायक इमारतींमधील भाडेकरू तथा रहिवाश्यांनी त्यांच्या स्तरावर वास्तव्याची पर्यायी व्यवस्था केल्यास मंडळामार्फत दरमहा २० हजार रुपये भाडे अदा करण्याचा निर्णय ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी नुकताच जाहीर केला आहे. तसेच बाहय यंत्रणेमार्फत तीन वर्षाकरिता १८० ते २५० चौरस फुट क्षेत्रफळाचे ४०० गाळे अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू रहिवाश्यांकरिता भाडेतत्वावर घेण्याबाबत जाहिरात देण्याचे निर्देशही मंडळास दिले आहेत.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे पावसाळापूर्व सर्वेक्षणात ९६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या अतिधोकादायक इमारतींमध्ये (Dangerous buildings) सुमारे २४०० भाडेकरू तथा रहिवासी वास्तव्यास असून त्यांना तातडीने संक्रमण शिबीरात स्थलांतरित करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत मंडळाकडे फक्त ७८६ संक्रमण गाळे उपलब्ध असल्याने अतिधोकादायक इमारतींमधील भाडेकरू/रहिवासी यांना तात्पुरत्या स्वरुपात संक्रमण शिबिरांतून पर्यायी निवासाची व्यवस्था देणे मंडळास शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या भाडेकरू/रहिवासी यांच्या जीवितास धोका पोहचू नये व त्यांची मुंबईत इतरत्र निवासाची पर्यायी व्यवस्था देणे आवश्यक असल्याने ‘म्हाडा’चे (MHADA) उपाध्यक्ष जयस्वाल यांनी सदर निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – Bhagat Puran Singh : स्वतःचे दुःख विसरुन दुसर्यांचे दुःख नाहीसे करणारे महान संत)
वरील दोन्ही प्रकारे होणारा खर्च सदर इमारतीच्या जागेवर पुनर्विकासासाठी खाजगी विकासकांना, सहकारी गृहनिर्माण संस्था यांना विकासासाठी दिल्यास विकासकांना ज्या दिवसापासून मंडळामार्फत प्रति माह २०,००० रुपये भाडे अदा करण्यात आले आहे. अथवा बाहय यंत्रणेमार्फत तीन वर्षाकरिता १८० चौ. फुट ते २५० चौ. फुट क्षेत्रफळाचे ४०० गाळे भाडयाने घेतलेले आहे त्याचा देखभालीसह संपूर्ण खर्च विकासकाने व सहकारी गृहनिर्माण संस्था यांनी भरणे बंधनकारक राहिल, असाही निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे.
मुंबई शहरात आता प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या एकूण १३,०९१ आहे. मंडळाकडे एकूण २०,५९१ संक्रमण गाळे आहेत. उपकरप्राप्त इमारती पडणे, धोकादायक म्हणून जाहीर करणे किंवा इमारतीची संरचनात्मक दुरूस्ती अशा विविध कारणांसाठी रिकाम्या करण्यात येणाऱ्या उपकरप्राप्त इमारतीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या भाडेकरू /रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरूपात निवासाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने मंडळामार्फत शहरात व उपनगरात संक्रमण शिबिरामध्ये गाळे उपलब्ध करण्यात येतात. मोडकळीस तथा दुरूस्ती अंतर्गत असलेल्या उपकरप्राप्त इमारतीतील पात्र भाडेकरू, रहिवासी, अरूंद भूखंड असल्यामुळे पुनर्बांधणी न होणा-या इमारतीतील भाडेकरू, रहिवासी, रस्ते रूंदीकरणात निष्कासित झालेले रहिवाशी तसेच संक्रमण शिबीर पुनर्बांधणी अंतर्गत स्थलांतरीत करावयाचे पात्र भाडेकरू, रहिवासी यांना कायम पर्यायी व्यवस्था होईपर्यंत संक्रमण शिबीरात तात्पुरत्या स्वरूपात निवारा देण्यात येतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community