MHADA : म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत-२०२३ : ३५३३ पैंकी ३५१५ विजेत्या अर्जदारांना ऑनलाईन तात्पुरते देकार पत्र जारी

तात्पुरते देकार पत्र देणे या प्रक्रियेला ०९ महीने ते दीड वर्षांचा कालावधी लागायचा.

142
MHADA : म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत-२०२३ : ३५३३ पैंकी ३५१५ विजेत्या अर्जदारांना ऑनलाईन तात्पुरते देकार पत्र जारी
MHADA : म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत-२०२३ : ३५३३ पैंकी ३५१५ विजेत्या अर्जदारांना ऑनलाईन तात्पुरते देकार पत्र जारी

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे नुकत्याच जाहीर ४०८२ सदनिकांच्या संगणकीय सोडतीतील स्वीकृती पत्र सादर केलेल्या ३५३३ पैकी ३५१५ विजेत्या अर्जदारांना सोमवारी एका क्लिकवर एकाचवेळी सदनिकेची विक्री किंमत भरण्यासंदर्भातील ऑनलाईन तात्पुरते देकार पत्र ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते पाठविण्यात आले. त्यामुळे म्हाडाच्या नियमानुसार घराच्या किमतीचा हप्ता भरल्यास म्हाडाच्या वतीने गृहकर्जासाठी ऑनलाईन एनओसी दिले जाणार असून त्यामुळे घराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर केवळ चावी घेण्यासाठीच यशस्वी अर्जदाराला म्हाडात यावे लागणार आहे. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात बोलतांना जयस्वाल यांनी सदनिका विक्री सोडत प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा आणण्यासाठी नवीन संगणकीय सोडत प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता मुंबई मंडळाचे आणि संगणक कक्षाचे कौतुक केले.

मुंबई मंडळाच्या सन २०१३ पासून आजतागायत झालेल्या सोडतीत सोडत जाहीर होणे ते अर्जदारास प्रथम सूचना पत्र (First Intimation Letter) देणे, तात्पुरते देकार पत्र देणे या प्रक्रियेला ०९ महीने ते दीड वर्षांचा कालावधी लागायचा. मात्र, मानवी हस्तक्षेपशिवाय कार्यान्वित Integrated Housing Lottery Management System (IHLMS 2.0) प्रणालीच्या माध्यमातून केवळ २१ दिवसांतच अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविण्याची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. तसेच मुंबई मंडळाच्या या तत्पर आणि पारदर्शक कार्यप्रणालीमुळे नागरिकांना म्हाडाच्या लोकाभिमुख, सुलभ, पारदर्शक, विश्वासार्ह कारभाराची नक्कीच प्रचिती आली असेल, असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला. याप्रसंगी म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, सहमुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे, उपमुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, मुख्य लेखाधिकारी एम. जे. रोड्रिक्स आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जयस्वाल यांनी सर्व यशस्वी अर्जदारांना शुभेच्छा देत आवाहन केले की, आज तात्पुरते देकार पत्र मिळाले आहे याच माध्यमातून त्यांना प्राप्त झालेल्या सदनिकेची रक्कम भरण्याचे विकल्प या संगणकीय प्रणालीद्वारे उपलब्ध झाले आहेत. देकार पत्रामध्ये नमूद माहितीचे अवलोकन करून अर्जदार लाभार्थ्यांनी सदनिकेची रक्कम भरल्यास त्यांना लवकरात लवकर हक्काच्या घराचा ताबा मिळू शकणार आहे. सोडतीतील विजेत्या अर्जदारांनी सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी एकूण १९५ दिवसांची मुदत आहे. सदनिकेची रक्कम भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. ज्या अर्जदारांना एका टप्प्यात १०० टक्के रक्कम भरावयाची असल्यास त्यांना ४५ दिवसात ती रक्कम भरता येणार आहे. दुसर्‍या टप्प्यांतर्गत सदनिकेच्या विक्री किंमतीचा २५ टक्के भरणा ४५ दिवसांत तर उर्वरित ७५ टक्के रकमेचा भरणा ६० दिवसांत करायचा आहे. २५ टक्के रक्कम भरण्यासाठी १५ दिवस व उर्वरित ७५ टक्के रक्कम भरण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढही तात्पुरते देकार पत्राद्वारे अर्जदारांना दिली आहे. २५ टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर उर्वरित ७५ रक्कम उभारण्यासाठी अर्जदारास गृह कर्ज घेण्यासाठी अर्जदारांच्या विनंतीनुसार मंडळातर्फे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) ऑनलाईन दिले जाणार आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत विजेत्या अर्जदारास म्हाडामध्ये केवळ सदनिकेची चावी घेण्यासाठी यायचे असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

(हेही वाचा – Rajnath Singh : राजस्थान भ्रष्टाचारामध्ये आघाडीवर)

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना मंडळाचे उपमुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी असे सांगितले की, नूतन IHLMS 2.0 संगणकीय सोडत प्रणालीच्या माध्यमातून अर्जदारांची पात्रता सोडतीपूर्वीच निश्चित करण्यात आली असल्याने पात्र अर्जदारांचीच संगणकीय सोडत काढण्यात आली. यावर्षी मुंबई मंडळाने दि. १४ ऑगस्ट, २०२३ रोजी सदनिकांची सोडत ऑनलाईन काढल्यानंतर सर्व अर्जदारांना सुमारे १० दिवसांत स्वीकृती पत्र पाठविले. स्वीकृती पत्र स्वीकारलेल्या सर्व अर्जदारांना आज म्हणजे सोडत जाहीर केल्याच्या २१ व्या दिवशी तात्पुरते देकार पत्र (Provisional Offer Letter) ऑनलाईन पाठविण्यात आले आहे. सोडतीतील अयशस्वी अर्जदारांसाठी अनामत रकमेचा परतावा तात्काळ करण्यात आला आहे. ३९८ अर्जदारांनी त्यांना सोडतीत प्राप्त झालेली सदनिका मंडळाला परत करण्याबाबतचा निर्णय कळविला आहे. यामध्ये प्रामुख्याने असे अर्जदार आहेत ज्यांना सोडतीत एकापेक्षा अधिक सदनिका मिळाल्या आहेत. या अर्जदारांच्या अनामत रकमेचा परतावा तात्काळ केला जाणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. मुंबई मंडळाचे सदनिका सोडतीचे कामकाज ऑनलाईन असल्यामुळे लेखणी विरहित (Penless) झाले आहे, याद्वारे सोडत प्रक्रियेत सहभाग घेणे नागरिकांना सुलभ व सोपे झाले त्यामुळे नागरिकांची होणार्‍या त्रासातून मुक्तता (Painless) झाल्याचे अनुभवास येत आहे, असे गायकवाड यांनी मत व्यक्त केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.