MATHERANची ट्रिप होणार स्वस्त, मध्य रेल्वेकडून लवकरच ‘ही’ सेवा उपलब्ध

5838
MATHERANची ट्रिप होणार स्वस्त, मध्य रेल्वेकडून लवकरच 'ही' सेवा उपलब्ध

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान येथे येणाऱ्या पर्यटकांना आता महागड्या हॉटेल्सबरोबरच स्वस्त हॉटेलचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. लवकरच येथे आता मध्य रेल्वेच्या पॉड हॉटेल्सची सेवा उपलब्ध होणार आहे. खासगी हॉटेल्सच्या तुलनेत पॉड हॉटेल्सचे भाडे तुलनेने कमी असणार असून, प्राथमिक स्तरावर हे भाडे ८०० ते १००० रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. यामुळे माथेरानला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना खासगी हॉटेल्सच्या तुलनेत स्वस्तात पॉड हॉटेल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ही सेवा सुरू होण्यासाठी मान्सूननंतरचा कालावधी उजाडण्याची शक्यता आहे. (MATHERAN)

राज्यभरातून पर्यटक महाबळेश्वर आणि माथेरानमध्ये फिरण्यासाठी दाखल होत असतात. विशेषत: मुंबईकरांचा माथेरानला जाण्याकडे अधिक कल असतो. मध्य रेल्वे मार्गाने नेरळ येथे उतरून माथेरान गाठत सुट्टीत धमाल केली जाते; मात्र माथेरान येथे राहायचे म्हटल्यावर खासगी हॉटेल्सवर अधिक खर्च करावा लागतो. माथेरान येथील खासगी हॉटेल्सचे भाडे २ हजारांपासून सुरू होत असून, अडीच, तीन, साडेतीन हजारांच्या घरात आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील पर्यटकांकडून एक दिवसीय पर्यटनावर भर दिला जातो; मात्र अनेक पर्यटक राज्याच्या कानाकोपऱ्यासह राज्याबाहेरून दाखल होत असतात. त्यांच्याकडे खासगी हॉटेल्सचे दार ठोठावण्याशिवाय पर्याय नसतो, अशा पर्यटकांना मध्य रेल्वे दिलासा देणार आहे. (MATHERAN)

(हेही वाचा – मध्य रेल्वे मेगाब्लॉकच्या काळात Best Bus ने कमावले एवढे रुपये? जाणून घ्या… )

पर्यटक आणि प्रवाशांना उत्तम सुविधा प्रदान
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पहिले पॉड हॉटेल सुरू करण्यात आले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या माथेरान -सीएसएमटी स्थानकात पॉड हॉटेलची सुविधा देण्यात आली. पॉड हॉटेलमध्ये पर्यटक आणि प्रवाशांना उत्तम सुविधा प्रदान करण्यात येते. पॉड हॉटेलला मिळणाऱ्या पसंतीमुळे मध्य रेल्वेने पर्यटकांच्या सुविधेसाठी माथेरानमध्ये पॉड हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात ऑनलाइन निविदा सप्टेंबर २०२३ रोजी काढण्यात आली. यशस्वी बोलीकर्त्याने ८,१९,००० रुपये वार्षिक रकमेसाठी करार केला. कराराची पहिली ३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवाना शुल्कात १० टक्के वार्षिक वाढ करण्याच्या तरतुदीसह एकूण कराराचा कालावधी १० वर्षांचा आहे. एकूण ७५८.७७ चौमी क्षेत्रफळावर पॉड हॉटेल असणार आहे. पॉड हॉटेल्सचे काम पूर्ण झाल्यानंतर एकेरी, दुहेरी आणि कुटुंबासाठी हे हॉटेल्स सोयीचे ठरतील. पॉड हॉटेल्सचे भाडे सातशे आठशे असू शकते; मात्र अद्याप भाड्याचा ठोस आकडा ठरलेला नाही. तरीही खासगी हॉटेल्सच्या तुलनेत पॉड हॉटेल्स पर्यटकांना कमी किमतीत उपलब्ध होईल, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे.

पॉड हॉटेल्सचा फायदा कोणाला?
बिल्ट, ऑपरेट आणि ट्रान्सफर तत्त्वावर स्लीपिंग पॉड्स (पॉड हॉटेल) विकसित करत चालविले जाईल. पॉड हॉटेलमध्ये सर्व आवश्यक आणि आधुनिक सुविधा असतील. पॉड्सचा विकास आणि ऑपरेशन ही परवानाधारकाची जबाबदारी असेल. त्यासाठीचा संपूर्ण खर्च परवानाधारकाला उचलावा लागेल. उभारणीचा खर्च, स्लीपिंग पॉडशी संबंधित वस्तू लॉकर्स आणि इतर आवश्यक सुविधा, साईटची सुरक्षा, देखभाल, केबल, फॅब्रिकेशन, वीज वापर शुल्क, वीज ठेव, विद्युत कनेक्शन इत्यादीसाठींचा खर्च परवानाधारक ठेकेदाराने करायचा आहे. जगात पहिल्यांदा जपानमध्ये पॉड हॉटेल्स सुरू करण्यात आले होते. माथेरानमधील पॉड हॉटेलचा फायदा राज्यभरासह बाहेरील राज्यातून येणाऱ्या पर्यटकांना होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.