Marriage Bureau Website : विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांचा फसवणुकीचा धंदा; नोंदणी करणाऱ्यांच्या मुला-मुलींच्या माहितीचा होतोय गैरवापर

अनेक नवनव्या संकेतस्थळांवर असलेली विशेषतः मुलं केवळ टाईमपास करण्यासाठी चॅटिंग करत असल्याचे आढळून आले आहे. या मुला-मुलींची संकेतस्थळांवर असलेली माहिती आणि त्यांची प्रत्यक्षात असेलली नावे आणि माहिती यात तफावत असल्याचे आढळले आहे.

6051

तुमची मुलगी लग्नाला आली आहे आणि तुम्ही विवाह जुळवणाऱ्या एखाद्या ऑनलाईन संकेतस्थळाच्या संपर्कात आला असाल तर सावधान! ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण तुम्ही डोळे झाकून तुमच्या मुला-मुलीची सगळी माहिती त्या संकेतस्थळावर नोंदवता, मात्र त्यानंतर त्या माहितीचा संबंधित संकेतस्थळाकडून (Marriage Bureau Website) गैरवापर होत आहे. ही धक्कादायक माहिती उघड झाल्यापासून खळबळ उडाली आहे.

अनेकांना आपल्या मुलीचे किंवा मुलाचे पारंपरिक पद्धतीने अरेंज मॅरेज करावे अशी इच्छा असते, अथवा करियर घडवण्याच्या नादात लग्नाचे वय निघून जाते मग विवाह होण्यासाठी पर्याय म्हणून विविह जुळवणाऱ्या संस्थांचा आधार घेतला जातो. यासाठी अनेक विवाह संस्था आणि मंडळ कार्यरत आहेत. मात्र सध्या अनेकजण घरबसल्या स्थळ मिळावीत म्हणून ऑनलाईन संकेतस्थळांचा उपयोग करतात. त्यामुळे अशा संकेतस्थळांचे (Marriage Bureau Website) पेव फुटले आहे. परंतु अशाच संकेस्थळांकडून फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील वाशी येथून ‘नप्चल्स’ (nuptials) या नावाने अश्विनी पाटील नावाची महिला ऑनलाईन विवाह जुळवणारे संकेतस्थळ चालवतात. या संकेतस्थळांकडून फसवणूक केल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका विवाह इच्छूक मुलीच्या पालकांनी त्यांचा अनुभव सांगितला.

(हेही वाचा Narendra Modi 3.0 : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे कोणकोणती खाती?)

या पालकांनी या संकेतस्थळावर पैसे भरून त्यांच्या मुलीचे नाव नोंदवले. त्यानंतर काही इच्छुक स्थळांची माहिती आणि दूरध्वनी क्रमांक देण्यात आले. संबंधित पालकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर इच्छुक स्थळांना संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर समोरील व्यक्तींनी त्या ठिकाणी विवाहासाठी कोणतीही नावनोंदणी केली नसल्याचे सांगितले. त्यानंतर खातरजमा करण्यासाठी त्या पालकांनी अन्य काही स्थळांची माहिती मागवून घेतली असता त्यांना तोच प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आले. चौकशीअंती हाच अनुभव अन्य पालकांनाही आल्याचे लक्षात आले आहे. नागपूर आणि मुंबईतून रिया जाधव नावाच्या महिलेचे ‘विवाहसंस्था’ या नावाचे संकेतस्थळ सुरू असून त्यातही असाच अनुभव वधू-वराच्या आई-वडिलांना आल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे मोडस ऑपरेंडी? 

बनावट संकेतस्थळ (Marriage Bureau Website) चालवणारी ही मंडळी काही मान्यवर विवाह संस्थांकडून मुलामुलींचे प्रोफाईल कॉपी करून घेतात आणि आपल्याच काही लोकांना फोनवर बोलायला सांगून इच्छुक स्थळांची माहिती गोळा करतात असे दिसून येतंय. यात मान्यवर विवाह संस्थांमध्ये काम करणाऱ्या काही लोकांकडून वधू-वरांची सविस्तर माहिती चोरली जात असावी, अशा पध्दतीने काम कऱण्याऱ्यांची टोळी कार्यरत असावी आणि ते मिळून काही इच्छुक मुला-मुलींची सविस्तर माहिती एकमेकांना पुरवत असावेत, असा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पालकांनी अशा संकेतस्थळांपासून (Marriage Bureau Website) सावध राहावे, असे आवाहन बनावट संकेतस्थळांना बळी पडलेल्या पालकांनी केले आहे. विवाह जुळवणाऱ्या अनेक संकेतस्थळांवर मुलामुलींना आपला योग्य साथीदार निवडण्यापूर्वी एकमेकांशी बोलण्याची मुभा दिली जाते. इच्छुकांच्या आई-वडिलांनादेखील आपल्या पाल्याने योग्य जोडीदार निवडावा असे वाटत असते. मात्र अशा अनेक नवनव्या संकेतस्थळांवर असलेली विशेषतः मुलं केवळ टाईमपास करण्यासाठी चॅटिंग करत असल्याचे आढळून आले आहे. या मुला-मुलींची संकेतस्थळांवर असलेली माहिती आणि त्यांची प्रत्यक्षात असेलली नावे आणि माहिती यात तफावत असल्याचे आढळले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.