मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभागाचे सहायक अभियंता अजय पाटील यांच्यावर शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सहायक आयुक्तांच्या कार्यालयातच हल्ला केला. एच पूर्व विभाग कार्यालयाचा वापर मागील पाच वर्षांपासून शिवसेनेची शाखा असल्यासारखाच झाला होता. या विभागातील सर्व अधिकारी हे शिवसेनेचे नेते आणि नगरसेवकांच्या निर्देशानुसारच विभागात काम करत होते. त्यामुळे मागील पाच वर्षांत ज्या अभियंता, अधिकाऱ्यांना शिवसेनेने आपल्या इशाऱ्यावर नाचवले, त्याच अधिकाऱ्यांना आता सत्ता जाताच तुडवायलाही सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी एच पूर्व विभागाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने परिवहन विभागाच्या सुचनेनुसार वांद्रे पूर्व येथील शिवसेना (उबाठा) प्रणित रिक्षा युनियनच्या कार्यालयावर बुलडोझर चढवला होता. हे रिक्षा युनियनचे कार्यालय शिवसेनेची शाखा असल्याचा दावा शिवसेनेने केला आणि यावरील कारवाईच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चातील काही कार्यकर्त्यांनी थेट सहायक आयुक्त स्वप्नजा क्षिरसागर यांच्या कार्यालयातच आमची शाखा का तोडली अशी विचारणा करतच हल्लाबोल केला. यावेळी सहायक आयुक्त या तेथे आलेल्या कार्यकर्त्यांना रिक्षा युनियनचे कार्यालय तोडले याची माहिती पटवून देण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्या नंतर सहायक अभियंता अजय पाटील हे पुढे येवून काही सांगत असतानाच जमावातील एकाने त्यांच्या श्रीमुखात लगावले आणि दुसऱ्या त्यांच्या डोक्यावर मारले.
अजय पाटील यांना मारहाण होते याची कल्पना येताच तेथील सुरक्षा रक्षकाने आपल्या आताच कडे करत त्यांना तिथून बाजुला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु सहायक आयुक्तांच्या डोळ्या देखत आणि त्यांच्या कार्यालयातच ही घटना घडल्याने याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
दरम्यान, महापालिकेतील सर्व अभियंत्यांच्या संघटनांनी याचा तीव्र निषेध केला असून बृहन्मुंबई म्युनिसिसपल इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी या घटनेतील हल्लेखोरांना जोवर अटक केले जात नाही तोवर एच पूर्व विभागातील सर्व अभियंते या घटनेचा निषेध म्हणून कामबंद आंदोलन पुकारतील अशी घोषणा केली. तसेच हे आंदोलन २४ विभाग कार्यालयांमध्ये पुकारले जाईल. पण यापुढे कोणत्याही अभियंत्यांवरील हल्ला आम्ही सहन करणार नाही. हल्लेखोरांना अटक करा, नाहीतर काम बंद आंदोलन हे निश्चितच असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने त्यांचे राजकारण करावे, परंतु त्या राजकारणात आमच्या अभियंत्यांवर गोवले जावू नये,असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या पक्षाचा मोर्चा होता, परंतु आम्ही मोर्चा काढून चर्चा झाल्यानंतर निघून गेलो. आम्हाला या हल्ल्याविषयी माहितीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात व्हिडीओमध्ये माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर,भूतकर आदी मंडळी दिसत आहे.
हा मोर्चा म्हणजे एक जुलैच्या मोर्चाची रंगीत तालिम
शिवसेना उबाठा गटाच्यावतीने मुंबई महापालिका मुख्यालयातवर १ जुलै २०२३ रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. शनिवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचा सराव म्हणून २६ जून रोजी एच पूर्व विभागात मोर्चा काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवकांच्या एका चाळीतील अनधिकृत बांधकामांवर तसेच शिवसेना रिक्षा युनियन कार्यालय काही दिवसांपूर्वी महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली होती. परंतु या प्रकरणी जाब विचारु शकत नसल्याने दुषित पाणी, रस्त्यांची समस्या आदी विषयांवर हा मोर्चा काढून प्रत्यक्षात अनधिकृत बांधकामावरील कारवाईचाच जाब त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु हा मोर्चा म्हणजे १ जुलैच्या मोर्चाची रंगीत तालिमच असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community