
भारताला विज्ञानाधिष्ठित ओळख मिळवून देणाऱ्या आणि खगोलशास्त्राच्या क्षेत्रात नवे क्षितिज गाठणाऱ्या पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर (Dr. Jayant Narlikar) यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली आहे. डॉ. नारळीकर यांच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री म्हणाले, “भारतीय खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालणाऱ्या या महान वैज्ञानिकाने केवळ संशोधनच केले नाही, तर वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठीही आयुष्य झोकून दिले.”
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. डॉ. नारळीकर यांच्या कन्या गिरीजा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांनी कुटुंबीयांना सांत्वनही दिले.
(हेही वाचा – Indo – Pak Cricket : आशिया क्रिकेट परिषदेतून माघार घेणार नाही; बीसीसीआय सचिव यांचा इशारा)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
“भारतातील खगोलशास्त्र, विज्ञान लेखन आणि विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात क्रांती घडवणारे ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. जयंत विष्णु नारळीकर (Dr. Jayant Narlikar) यांच्या निधनामुळे विज्ञानविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. नारळीकर हे केवळ भारताचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे खगोलशास्त्रातील मान्यवर संशोधक होते. त्यांच्या संशोधनामुळे भारतीय विज्ञानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव झाले. मराठी मातीतील या थोर सुपुत्राने खगोलशास्त्रात जी झेप घेतली ती महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. डॉ. नारळीकर यांचे निधन ही केवळ शारीरिक अनुपस्थिती नसून, विज्ञान क्षेत्रातील एक प्रकाशझोत हरपल्यासारखे आहे. नव्या पिढीतील संशोधक, विद्यार्थी, आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक यांना त्यांनी दिलेली दिशा कायम प्रेरणादायी ठरेल, असा मला विश्वास आहे,” असे भावनिक उद्गार उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी काढले.
(हेही वाचा – मुंबईकर घाबरू नका! ते दोन मृत्यू कोविडमुळे नाही; KEM Hospital ने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…)
वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला – अजित पवार
“जागतिक किर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं. विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केलं. विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनानं ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
“डॉ. जयंत नारळीकर (Dr. Jayant Narlikar) जागतिक किर्तीचे वैज्ञानिक तसंच विज्ञानवादी विचार समाजात रुजवणारे कार्यशील विचारवंत होते. भौतिक विज्ञान, खगोल विज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी स्थापन केलेली ‘आयुका’ संस्था ही देशाचं ज्ञानवैभव ठरली आहे. वैज्ञानिक क्षेत्रात स्थूलविश्वाचा उगम व बदलत्या स्वरूपावरच्या संशोधनामुळे जागतिक वैज्ञानिकांमध्ये ते आदरस्थानी होते. ‘क्वासी स्टेडी स्टेट थिअरी’संदर्भातील त्यांचं संशोधन मैलाचं दगड ठरलं आहे. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेला विज्ञानवादी दृष्टीकोन, अंधश्रद्धेवरचा प्रहार कायम स्मरणात राहील. ‘महाराष्ट्रभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’सारख्या मान-सन्मानानं गौरवान्वित डॉ. जयंत नारळीकरांचं निधन ही देशाची कधीही न भरून येणारी हानी आहे. त्यांनी सुरु केलेलं विज्ञानप्रसाराचं कार्य पुढे सुरु ठेवणं, विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात, विशेष करुन भावी पिढीमध्ये रुजवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community