-
प्रतिनिधी
राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांचा अद्ययावत तपशील एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने “डॅशबोर्ड” (Dashboard) विकसित करण्यात आला आहे. या डॅशबोर्डचे उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुरुवारी मंत्रालयात करण्यात आले.
या डॅशबोर्डमध्ये (Dashboard) विद्यापीठाशी संबंधित प्रवेश प्रक्रिया, निकाल, शिष्यवृत्ती, वसतिगृहे, शुल्क आणि महाविद्यालयांशी संबंधित संलग्नता आणि शैक्षणिक सुविधा तसेच सार्वजनिक ग्रंथालय यांची माहिती समाविष्ट आहे. या डॅशबोर्डवर २६ सार्वजनिक विद्यापीठे आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा समावेश असून भविष्यात राज्यातील सर्व खासगी आणि सार्वजनिक विद्यापीठांचा समावेश डॅशबोर्डमध्ये करण्यात येणार आहे. हा डॅशबोर्ड उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाबरोबरच सर्वसामान्य जनतेसाठीही उपलब्ध आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj यांची पालखी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विराजमान)
या डॅशबोर्डमधील (Dashboard) माहितीचे विश्लेषण करून शैक्षणिक विषयांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्या शैक्षणिक बाबींकरिता खात्रीशीर अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजित असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
डॅशबोर्डवरील (Dashboard) अधिक माहिती https://dashboardhtedu.maharashtra.gov.in/home यावर उपलब्ध आहे. यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, अशोक मांडे, संतोष खोरगडे उपस्थित होते. तर सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community