Hoarding Policy : जाहिरात आणि जाहिरात फलकांसाठी महापालिकेचे मार्गदर्शक धोरण, प्रक्रियेला सुरुवात

528
Hoarding Policy : जाहिरात आणि जाहिरात फलकांसाठी महापालिकेचे मार्गदर्शक धोरण, प्रक्रियेला सुरुवात

मुंबई महापालिकेच्यावतीने यापूर्वी बनवण्यात आलेले जाहिरातींचे धोरण लटकलेचे असतानाच आता महापालिकेने नव्याने जाहिरात आणि जाहिरात फलकांबाबत नव्याने मार्गदर्शक धोरण बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गदर्शक धोरणांच्या अनुषंगाने गुरुवारी महापालिकेत जाहिरात फलकांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींकडून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यामुळे लवकरच येत्या काही दिवसांमध्ये या मार्गदर्शक तत्वांचा मसुदा महापालिकेच्यावतीने लोकांच्या हरकती आणि सुचनांसाठी प्रसिध्द केल्या जाण्याची शक्यता आहे. (Hoarding Policy)

घाटकोपर येथील महाकाय जाहिरात फलकाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील जाहिरात धोरणाच्या मार्गदर्शक धोरणांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्यावतीने जुन्या मार्गदर्शक धोरणातील सुधारीत मंजुरीनुसार जाहिरात आणि जाहिरात फलकांना परवानगी देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे नव्याने जाहिरात फलक आणि जाहिराती आदींसाठी मार्गदर्शक धोरणाचा मसुदा बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या अंतर्गत मुंबईतील जाहिरात फलक असोशिएशन्सच्या प्रतिनिधींची एक बैठक महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या समवेत बैठक पार पडली. (Hoarding Policy)

(हेही वाचा – भाजपा निर्विवादपणे महाराष्ट्रात महायुतीला यश मिळवून देईल; Pravin Darekar यांनी व्यक्त केला विश्वास)

या बैठकीला दोन मान्यता प्राप्त असोशिएशन आणि आणखी एक याप्रकारे एकून तीन असोशिएशनचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला मान्यता प्राप्त असोशिएशनचे १० ते १२ प्रतिनिधी आणि इतर असोशिएशनचे ४ प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शक धोरणाच्या मसुद्यात काय असेल याची माहिती देण्यात आली. तसेच याबाबत आपल्या काही सूचना असल्यास आपण लेखी स्वरुपात द्याव्यात जेणेकरून याचा मसुदा बनवताना त्या जर योग्य असतील तर त्यांचा समावेश करता येईल असे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Hoarding Policy)

महापालिकेच्यावतीने जाहिरात फलक आणि जाहिरात यासंदर्भात बनवण्यात येणाऱ्या मार्गदर्शक धोरणामध्ये एलईडी फलकांबाबतचाही समावेश आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात आयआयटीच्या माध्यमातूनही त्यांच्या याबाबतच्या सूचना जाणून घेतल्या जातील. जेणेकरून याचा समावेश या धोरणाच्या मसुदा पत्रात करता येणार आहे. या जाहिरात धोरणामध्ये दुकान, मॉलवरील जाहिरात फलक तसेच इतर सर्वच ठिकाणी जिथे जाहिराती केल्या जातात, त्या सर्व बाबींचा बारीक कंगोऱ्याने विचार करून या मार्गदर्शक धोरणाचा मसुदा बनवला जाणार आहे. त्यामुळे या जाहिराती धोरणाचा मसुदा तयार झाल्यानंतर आयुक्तांच्या मंजुरीने जनतेच्या हरकती व सूचनांसाठी लवकरच प्रदर्शित केले जाण्याची दाट शक्यता आहे. (Hoarding Policy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.