BMC : रस्ता कुणाच्या मालकीचा आणि किती रुंदीचा पाहू नका; पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर अतिरिक्त आयुक्तांचे खड्डे बुजवण्याचे निर्देश

132

रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी सध्या कोल्डमिक्स, मास्टिक एजन्सी आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट अशा तीन पद्धतीमधून काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची रूंदी किती आहे, कोणाच्या हद्दीतील किंवा कोणाच्या मालकीचा रस्ता आहे, या बाबी तूर्त मागे ठेवून सर्व खड्डे बुजवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशा प्रकारचे निर्देश अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरातील रस्त्यांवर पावसामुळे तयार झालेल्या खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घ्यावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील महानगरपालिका मुख्यालयात आज भेट देऊन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांना मुंबईतील रस्ते दुरुस्तीला वेग देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयात आज अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त वेलरासू यांनी बैठक घेऊन सर्व विभाग कार्यालयांसह संबंधित खात्यांना देखील निर्देश दिले आहेत.

यंत्रणांशी समन्वय साधून खड्डे बुजवावेत

मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील खड्ड्यांच्या तक्रारी प्रामुख्याने प्रकल्प रस्त्यांबाबतचे आहेत. प्रकल्प रस्त्यांबाबतीत परिरक्षणाबाबतीत कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर प्रसंगी दुप्पट दंड आकारणी, कठोर कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या विविध प्राधिकरणांसोबत समन्वय साधून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येतील, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच कोणत्याही प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्याबाबत तक्रार असली तरीही खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा मिळेल, यासाठी प्राधान्य द्यावे, या स्वरुपाच्या कामांचा खर्च संबंधित यंत्रणांकडून घेण्यासाठी नंतर परतावा शुल्क वसुली सादर करता येतील, असेही अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा Mangalprabhat Lodha : पालकमंत्री ऍक्शन मोडवर; रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी विशेष पथके तयार करण्याचे निर्देश)

प्रशासनाच्या लेखी द्रुतगती महामार्गाची स्थिती चांगली

खड्डे भरण्यासाठी सध्या कोल्डमिक्स, मास्टिक एजन्सी आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट अशा तीन पद्धतीमधून काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची रूंदी किती आहे, कोणाच्या हद्दीतील किंवा कोणाच्या मालकीचा रस्ता आहे, या बाबी तूर्त मागे ठेवून सर्व खड्डे बुजवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व उन्नत महामार्ग याठिकाणी रस्त्यांची स्थिती चांगली आहे. त्यासोबतच मुंबईतील सर्व मुख्य रस्ते आणि सेवा रस्ते याठिकाणीही खड्डे राहणार नाहीत, यासाठी काळजी घेण्याच्या सूचनाही वेलरासू यांनी केल्या.

पावसाळ्याच्‍या काळात कचरा संकलन व वहन अधिक क्षमतेने करावे

मुंबई शहर आणि उपनगरात मोठया प्रमाणात घनकचऱ्याच्या तक्रारींचा निपटारा करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला सूचना केल्या आहेत. पावसाळ्याच्‍या काळात कचऱ्याची योग्‍यपणे विल्‍हेवाट लावावी, कचरा संकलन व वहन अधिक क्षमतेने करावे, असे निर्देशही अतिरिक्‍त आयुक्‍त वेलरासू यांनी सर्व उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त आणि घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यास दिले. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार महानगरपालिकेने मुख्‍यमंत्री स्‍वच्‍छ मुंबई व्‍हॉटसऍप हेल्‍पलाईन सुरू केली आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणच्‍या कचरा विषयक तक्रारींची नोंद ८१६९६-८१६९७ या हेल्‍पलाईन क्रमांकावर नोंदविली जात आहे. संबंधितांनी छायाचित्र आणि ठिकाण यांची माहिती पाठविल्‍यास तत्‍काळ त्‍याचे निराकरण केले जात आहे. पावसाळ्यात कच-याविषयक समस्‍या उद्भवू शकतात. संभाव्‍य परिस्थिती विचारात घेता सर्व यंत्रणांनी समन्‍वयाने कचरा समस्‍या मार्गी लावावी. अधिक मनुष्‍यबळचा वापर करत, प्रसंगी वाहनांच्‍या फे-या वाढवून कचरा संकलन आणि वाहतूक अधिक क्षमतेने करावी. अधिका-यांनी आपापल्‍या विभागात आकस्मिक भेट देऊन पाहणी करावी. जागच्‍या जागी समस्‍येचे निराकरण करावे, असेही वेलरासू यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.