महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज ‘महाविस्तार AI’ ॲपचा शुभारंभ करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण केंद्र येथे राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत कृषी योजनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना बळकटी देणाऱ्या उपाययोजना, आणि हवामान बदलाच्या अनुषंगाने कृषी क्षेत्रातील सज्जता यावर सविस्तर चर्चा झाली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून त्यांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. “Whole of the Government” या दृष्टिकोनातून केंद्र शासनाप्रमाणेच राज्यातही एकात्मिक दृष्टिकोनाने योजना राबवाव्यात, असे त्यांनी सांगितले. आधुनिक प्रयोग, योग्य मार्गदर्शन, आणि संसाधनांचा प्रभावी वापर यामुळेच शेतीत शाश्वतता येईल, असे ते म्हणाले. अनावश्यक बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांवर सक्ती करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
(हेही वाचा – Waqf हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही; केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली स्पष्ट भूमिका)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कृषी क्षेत्रात गटशेती, सेंद्रिय शेती, व नवकल्पनांच्या अंमलबजावणीवर भर देण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी कृषी यंत्रणांची पूर्ण तयारी असल्याचे सांगून, जलयुक्त शिवार योजना व बांबू लागवडीसारख्या उपाययोजनांच्या फायद्यांविषयीही माहिती दिली. “शेतीसाठीच्या शासनाच्या योजनांची एकत्रित अंमलबजावणी हेच खऱ्या अर्थाने यशाचे सूत्र आहे,” असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘फार्म ऑफ द फ्युचर’ या संकल्पनेचा उल्लेख करत, हवामान बदल व AI चा वापर शेतीत कसा होतो आहे हे स्पष्ट केले. ५० हजार शेतांवर नवकल्पनांची अंमलबजावणी सुरु असून, उत्पादनवाढीसह बाजारभाव व साखळी व्यवस्थापनावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतकरी समाधानी तर राज्य समाधानी,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी यावर्षी खरीप हंगामासाठी १५२ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असून, बियाणे आणि खते यांची पूर्तता सुनिश्चित असल्याची माहिती दिली. राज्यात ५ हजार कोटींच्या गुंतवणुकीने कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार होत असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विमा योजनेत सुधारणाही करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
(हेही वाचा – Bomb Threat : पुणे रेल्वे स्टेशन, येरवडा, भोसरी येथे बॉम्ब ठेवल्याचा धमकीवजा फोन)
राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी पाण्याच्या नियोजनावर भर देत, डिजिटल करन्सीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना सातबारावरील अद्ययावत नोंदीमुळे योजनांचा लाभ सुलभतेने मिळवता येईल, असे त्यांनी सांगितले.
कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी ‘साथी’ पोर्टल, विविध योजना, आणि ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ यांविषयी माहिती दिली. राज्यातील १३.५ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनीही खरीप हंगामातील नियोजनाची माहिती दिली.
या बैठकीत ‘महाविस्तार AI’ ॲपसह, महा डीबीटी योजनेअंतर्गत नवीन योजना, कृषी विभागाच्या दिशादर्शिका यांचे प्रकाशन करण्यात आले. बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, राज्यमंत्री, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य सरकारचा (State Govt) हा एकात्मिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा संकल्प, आगामी खरीप हंगाम यशस्वी करण्यास निश्चितच मदत करणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community