Andheri Gokhale bridge: गोखले पुलाची एक बाजू १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाहतूकीसाठी खुली करणार!

या ब्लॉकसाठी अधिक कालावधी देण्यासाठी पश्चिम रेल्वेकडूनही दुजोरा देण्यात आला.

92
Andheri Gokhale bridge: गोखले पुलाची एक बाजू १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाहतूकीसाठी खुली करणार!
Andheri Gokhale bridge: गोखले पुलाची एक बाजू १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाहतूकीसाठी खुली करणार!

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्याच्या दृष्टीने २५ ऑक्टोबर २०२३ रोजी बैठक पार पडली. गोखले पुलाच्या रेल्वेवरील भागात गर्डर लॉंचिंग करण्याच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेमार्फत ब्लॉकसाठी अधिक कालावधी मिळावा अशी विनंती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना केली. या ब्लॉकसाठी अधिक कालावधी देण्यासाठी पश्चिम रेल्वेकडूनही दुजोरा देण्यात आला. (Andheri Gokhale bridge)

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांच्या दालनात झालेल्या बैठकीस आमदार अमित साटम, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले आणि रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी, राईट्स या सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी तसेच कंत्राटदार आदींची उपस्थिती होती.

गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरचे लॉंचिंगचे काम हे अत्यंत जिकिरीचे असल्या कारणाने ही बैठक आमदार शअमित साटम यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बोलावली होती. या बैठकीत गोखले पुलाच्या सद्यस्थितीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या कामासाठी राईट्स कंपनीकडून कार्यवाही होत आहे. गोखले पुलाच्या गर्डरचे लॉंचिंग करणे, गर्डर उत्तरेकडे सरकवणे आणि पूलाचा गर्डर सरकवल्यानंतर ७.५ मीटर खाली सुमारे १३०० टन वजनी आणणे हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम हे राईट्स या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. पहिल्या गर्डरचे काम हे अत्यंत जोखमीचे असल्याने हे काम अतिशय काळजीपूर्वक करण्याची जबाबदारी राईट्स या कंपनीने घेतली आहे. गोखले पुलाचे काम हे वेगाने व्हावे म्हणून राईट्स कंपनीद्वारे या पुलाच्या रेल्वेच्या भागातील लॉंचिंगसाठी किती आणि कधी ब्लॉक घ्यावेत, याबाबतची विस्तृत चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी निर्देश दिले की, गोखले पुलाच्या गर्डर लॉंचिंगसाठी लागणारे एकंदरीत ब्लॉक आदी इत्थंभूत माहिती व त्याबाबतचे रेखाचित्र रेल्वे प्रशासनाला लवकरात लवकर सादर करण्यात यावेत.

(हेही वाचा : DCM Ajit Pawar : राज्यातील पायाभूत विकासप्रकल्प वेळेत मार्गी लावा; अजित पवारांचे निर्देश)

एखाद्या पुलाच्या कामात ७.५ मीटर उंचीवरून गर्डर खाली आणणे हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. रेल्वेच्या साधारणपणे एक तासाच्या ब्लॉकमध्ये गर्डर फक्त १५ सेंटीमीटर इतकाच खाली आणता येईल. त्यामुळे गोखले पुलाच्या या अवाढव्य १३०० टन वजनी गर्डरकरिता ७.५ मीटर खाली उतरवण्याच्या कामासाठी लागणारा कालावधी हा अधिक असू शकतो. म्हणूनच रेल्वेचा ब्लॉकचा कालावधी वाढवून मिळावा अशी विनंती महानगरपालिका आयुक्त यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना केली. पश्चिम रेल्वेमार्फतही महानगरपालिकेच्या या मागणीला दुजोरा देण्यात आला आहे.

एकदा गर्डर खाली आणून स्थापन केल्यानंतर त्यावर सळया अंथरून सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरींगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येईल. ही सर्व कामे क्रमाने झाल्यानंतरच पूल एका दिशेच्या वाहतूकीसाठी खुला करणे शक्य होईल. गोखले पुलासाठी विविध टप्प्यातील होणारी कामे पाहता महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येते की, गोखले पुलाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही. तसेच एकंदरीतच पुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कामांच्या पूर्ततेचा कालावधी पाहता पूलाची एका दिशेची वाहतूक खुली करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत कालावधी अपेक्षित असल्याचे महानगरपालिका, राईट सल्लागार आणि रेल्वे प्रशासनाकडून आजच्या बैठकीत संयुक्तिकपणे स्पष्ट करण्यात आले.
हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.