मुंबईची जीवनवाहिनी बेस्ट बस गेली अनेक वर्ष मुंबई पोलिसांना निःशुल्क सेवा देत होती. परंतु आता लवकरच बृहन्मुंबई पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांचा बेस्ट उपक्रमाच्या बसगाडयामधून मोफत प्रवास बंद होणार आहे.
गृहखात्याने घेतला निर्णय
४ मार्च १९९१ रोजीच्या निर्णयाने मुंबई पोलीस दलातील जवळपास ५० हजार पैकी १/३ पोलीस अधिकाऱ्यांना बेस्ट बसमधून मोफत प्रवासास मुभा होती. मात्र आता पोलिसांचा हा ‘बेस्ट’ प्रवास बंद करण्याचा निर्णय गृहखात्याने घेतला आहे. येत्या १ जूनपासून पोलिसांच्या प्रवासावर होणारा खर्च बेस्टला देणे बंद करून थेट पोलिसांच्या दरमहा वेतनात हा वाहतूक भत्ता जमा केला जाणार आहे.
१ जून पासून मोफत प्रवास बंद
ऑनड्युटी पोलिसांना बेस्ट बसमधून मोफत प्रवास सवलत होती. मात्र अलिकडे बहुतांश पोलीस हे रेल्वे आणि स्वत:च्या खासगी वाहनातून प्रवास करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबत बेस्टला देण्यात येणारा भत्ता बंद करून पोलिसांना यापुढे त्यांच्या दरमहा वेतनात हा वाहतूक भत्ता देण्यात यावा हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय २२ एप्रिल रोजी घेण्यात आला मात्र याची अंमलबजावणी १ जून पासून करण्याचे आदेश देण्यात आले आहे.