Flood : कोल्हापूरकरांना दिलासा; पुराचे पाणी ओसरू लागले 

102

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने पुराचा वेढा दिलेल्या पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील इतर नद्यांमधूनही पाणी झपाट्याने उतरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगलीच उघडीप दिली आहे.29 जुलै रोजी रात्री बारा वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 41 फूट 4 इंच होती. 30 जुलै रोजी हीच पाणी पातळी 39 फूट 7 इंचांवर आली आहे. त्यामुळे पंचगंगा नदी वेगाने नदीपात्राकडे प्रवास करु लागली आहे. जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरु लागल्याने आता 35 बंधारे पाण्याखाली आहेत. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु होती. दुसरीकडे, गेल्या अनेक दिवसांपासून चिंता लागून राहिलेला कळंबा तलाव आज ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे कोल्हापूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

(हेही वाचा Russia-ukraine War : युक्रेनचा रशियावर भीषण बॉम्ब हल्ला)

राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला

पावसाचा जोर कमी झाल्यामुळे राधानगरी धरणाचे पाचही स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. मात्र, शनिवारी दुपारी पुन्हा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे. शनिवारी दुपारी सव्वा मिनिटांनी सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. यातून 1428 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. तर पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेक असा एकूण 2828 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

कळंबा तलाव भरला

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कळंबा तलावाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. तलावातील पाणी पातळी 26 फूट 9 इंचांवर पोहोचली आहे. तलाव तुडूंब भरत असल्याने निम्म्या शहरासह कळंबा, पाचगावचा पाणी प्रश्न सुटला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महापालिका व कळंबा ग्रामपंचायतीने तलावातून सहा एमएलडी पाणी उपसा सुरु केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.