सात वर्षानंतरही मुंबईतील वृद्धांसाठी नाही उभारले डे केअर सेंटर

201
सात वर्षानंतरही मुंबईतील वृद्धांसाठी नाही उभारले डे केअर सेंटर
सात वर्षानंतरही मुंबईतील वृद्धांसाठी नाही उभारले डे केअर सेंटर

मुंबईतील या धकाधकीच्या जीवनात कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुलांना घरी एकटे राहणाऱ्या आपल्या आईवडिलांची चिंता भेडसावत असते. त्यामुळे काही जण आईवडिलांकडे लक्ष ठेवण्यासाठी केअर टेकर नेमताना, तर काही जण आई वडिलांना एकटे घरात ठेवून निघून जातात. पण त्यांना घरात एकटे राहणाऱ्या आईवडिलांची चिंता असते. त्यामुळे मुलांची ही चिंता दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईचा विकास आराखडा मंजूर करताना प्रत्येक विभाग कार्यलयाच्या हद्दीत एक याप्रमाणे एक असे वृद्धाश्रम बांधण्याच्या जागा राखीव केल्या आणि त्याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली. परंतु सात वर्ष उलटत आले तरी या वृद्धाश्रमाचे बांधकाम अजून पूर्ण न झाल्याने त्यात त्यांच्यासाठी डे केअर सेंटरही खुले झाले नाही.

महापलिकेच्या प्रस्तावित ‘प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ ते २०३४’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन आरक्षणे प्रारुप स्तरावर प्रस्तावित केली. यामध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान १००० चौ. मी. जागा वृद्धाश्रमासाठी (Old Age Home) साठी आरक्षित ठेवण्यात आली. या आरक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे आता यात नियोजित वृद्धाश्रमांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘डे-केअर सेंटर’ उभारण्यात येणार होते. ज्यामुळे दिवसा घरी कोणी नसेल आणि ज्येष्ठांना सोबतीची गरज असेल तर अशा वेळी ज्येष्ठ नागरिक इथे येऊन राहू शकतील व आपल्या सम-वयस्कांबरोबर संवाद साधू शकतील. या विकास नियोजन आराखडा २०१४-२०३४’ अंतर्गत वृद्धाश्रमांसाठी आरक्षण ठेवतानाच त्यासोबतच लहान मुलांसाठी पाळणाघरेही ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे आता वृद्धाश्रम व पाळणाघर एकाच जागी बांधले जाऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन महानगरपालिकेने महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण २४ वृद्धाश्रम याकरता जागा राखीव ठेवल्या होत्या.

आजी-आजोबा व नातवंडे यांचे असणारे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते लक्षात घेऊन महापालिकेने वृध्दाश्रमांसाठी आरक्षण ठेवताना करतांना त्यामध्ये लहान मुलांसाठीचे ‘डे-केअर सेंटर’ उभारण्याच्या तरतुदीचाही समावेश होता. यामुळे आजी आजोबांसोबतच नातवंडांनादेखील या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात राहणे शक्य होईल या दृष्टिकोनातून हे बांधकाम करण्याचा प्रयत्न होता. या वृध्दाश्रमासाठी आरक्षित असणाऱ्या जागांवर वृध्दाश्रमासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी दवाखाना, जेष्ठांसाठी अनुरुप मनोरंजनात्मक बाबी आदी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त व महत्त्वपूर्ण असणाऱ्या बाबींचाही यात समावेश असेल. तसेच ही आरक्षणे प्रारुप स्तरावर प्रस्तावित करताना ती रुग्णालये, उद्याने इत्यादींच्या जवळ असतील याची देखील काळजी घेण्याचा प्रयत्न मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला होता.

(हेही वाचा – महाराष्ट्राला आपत्ती निवारणासाठी सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा निधी वितरित)

मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्या तत्कालीन सहायक आयुक्त असलेल्या प्राची जांभेकर यांनी २०१६ मध्ये यासाठी योजना तयार करून याची कागदोपत्री सर्व तयारी केली. त्यानुसार गोरेगाव येथे मागील गोरेगाव येथील जागेत मागील वर्षी महिला वसतिगृह आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर बांधण्यासाठी कंत्राटदाराची निवड केली असली तरी प्रत्यक्षात याचा काहीच पत्ता नसून सात वर्षांनंतरही आपण ही सुविधा देऊ शकलो नाही. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सरकार आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत एफ दक्षिण विभाग कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बनवण्याचे निर्देश दिले. पण प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांचा एकटे पणा घालवून त्यांना आपल्या समवयस्क व्यक्ति सोबत वेळ घालवता यावा यासाठी डे केअर सेंटर उभारण्याची कोणतीही कार्यवाही जलद गतीने होत नसल्याने प्रशासनाला निर्देश देता आलेले नाही. विशेष म्हणजे योगायोगाने नियोजन विभागाच्या संचालक पदी पुन्हा एकदा प्राची जांभेकर यांची नियुक्ती झाल्याने हे ज्येष्ठ नागरिक आणि छोट्या बाळांसाठी डे केअर सेंटर आणि महिलांसाठी वसतिगृह बनवण्याच्या कामाला गती देऊ शकतात. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात या कामांचा आढावा आता सरकारने घेतल्यास नक्की ही योजना तथा प्रकल्प कुठे अडकला याची माहिती मिळेल आणि याला गती मिळेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.