Europe : अचानक युरोपातील अनेक देशांमध्ये वीजेचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. यामध्ये फ्रान्स, स्पेन आणि पोर्तुगाल या तीन युरोपीय देशांमध्ये वीज गेल्यामुळे गोंधळ उडाला आहे. लाखो घरे अंधारात बुडाली आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की या देशांमध्ये रेल्वे आणि विमान सेवा बंद पडल्या आहेत. याशिवाय सुरुवातीला माद्रिद ते लिस्बन पर्यंतचा मोठा भाग अंधारात होता. तसेच मोठ्या प्रमाणात झालेल्या ब्लॅकआउटमुळे सबवे नेटवर्क, फोन लाईन्स, ट्रॅफिक लाइट्स, एटीएम मशीन्स आणि बरेच काही विस्कळीत झाले. माद्रिदच्या बाराजस आंतरराष्ट्रीय विमानतळावर वीजपुरवठा खंडित झाला आणि ब्लॅकआउटमुळे संपर्क साधण्यात मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे. (Europe)
लिस्बन विमानतळ जनरेटरवर अवलंबून वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लिस्बन विमानतळ बॅक-अप जनरेटरवर चालू आहे. तर स्पेनमधील ४६ विमानतळांचे व्यवस्थापन करणाऱ्या AENA ने देशभरातील उड्डाणांना विलंब झाल्याची तक्रार केली. तसेच स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता वीजपुरवठा खंडित झाला. ज्यामुळे माद्रिदमधील स्पॅनिश संसद आणि सबवे स्टेशनसह अनेक प्रमुख इमारती अंधारात गेल्या आहेत. स्पेनच्या वीज नेटवर्क वेबसाइटवरील एका आलेखात दुपारी १२:१५ वाजताच्या सुमारास मागणी २७,५०० मेगावॅटवरून सुमारे १५,००० मेगावॅटपर्यंत घसरल्याचे दिसून आले.
सायबर हल्ल्याची शक्यता स्पॅनिश अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, ब्लॅकआउटमुळे सायबर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची सखोल चौकशी केली जात आहे. याआधीही युरोपमध्ये किरकोळ तांत्रिक बिघाडांमुळे मोठे ब्लॅकआउट झाले आहेत. २००३ मध्ये, स्वित्झर्लंडमध्ये एका झाडामुळे वीज तार तुटल्याने संपूर्ण इटली अंधारात बुडाली होती. त्यामुळे यावेळीही तांत्रिक समस्या किंवा सायबर हल्ला या दोन्ही शक्यता आहे.