‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेतंर्गत भारतीय रेल्वेची गौरव डीलक्स वातानुकुलित पर्यटन रेल्वे!

98

भारत गौरव वातानुकुलित रेल्वे ही विशेष पर्यटन गाडी आयआरसीटीसीमार्फत चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन 28 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकांवरून आठ दिवसाच्या प्रवासाला निघणार आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावरील संकल्पनेतून साकारलेल्या भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेतंर्गत या रेल्वे गाडीची संरचना केली आहे. या संपूर्ण प्रवासात रेल्वेगाडीचा पहिला थांबा केवडिया इथं दिला असून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे याठिकाणी मुख्य आकर्षण ठरणार आहे. ही संपूर्ण रेल्वे गाडी आठ दिवसांच्या आपल्या प्रवासात साडेतीन हजार किलोमीटर प्रवासाचा टप्पा गाठणार आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांच्या मानसिक आरोग्याचेही होणार सर्वेक्षण : नायर रुग्णालयाची केली निवड)

सोमनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश मंदिर आणि बैत द्वारका या धार्मिक स्थळांनाही या प्रवासात भेट दिली जाणार आहे. या प्रवासात दोन दिवस अनुक्रमे केवडिया आणि अहमदाबाद इथल्या हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे तर सोमनाथ आणि द्वारका इथे दिवसाच्या मुक्कामा दरम्यान भेट दिली जाणार आहे.

या वातानुकूलित प्रवासी रेल्वे गाडीमध्ये दोन उपहारगृह, एक आधुनिक स्वयंपाकघर, रेल्वे डब्यांमध्ये शॉवर क्युबिकल्स, सेन्सर असलेली न्हाणीघर, फूट मसाजर यांसारखी काही वैशिष्ट्य पुरवण्यात आली आहेत. भारत सरकारच्या “देखो अपना देश” या उपक्रमाच्या माध्यमातून देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने भारत गौरव प्रवासी गाडीची सुरुवात झाली आहे.

तिकीटदर

  • द्वितीय श्रेणी – प्रत्येकी ५२ हजार २५० रुपये
  • प्रथम श्रेणी – प्रत्येकी ६७ हजार १४० रुपये

आयआरसीटीसी पर्यटन रेल्वे गाडीचा संपूर्ण प्रवास 8 दिवसांचा राहणार आहे. या समाविष्ट दरात वातानुकुलित हॉटेलमध्ये रात्रीचे वास्तव्य, बसमधून लगतच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट, संपूर्ण कालावधीत जेवण (फक्त शाकाहारी), प्रवासी विमा, मार्गदर्शक अर्थात गाईडची सेवा याचा समावेश असेल. आयआरसीटीसी कडून या प्रवासादरम्यान आरोग्याबाबत सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे. याबाबत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी IRCTC संकेतस्थळला भेट द्या : https://www.irctctourism.com

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.