मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला बसला आहे. मार्च महिन्यात अचानक पावसाला सुरूवात झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. छत्री, रेनकोट काहीच जवळ नसल्याने रेल्वे स्टेशन, बसथांब्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली. दरम्यान अवकाळी पावसामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील गाड्या तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहेत.
( हेही वाचा : भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार की नाही? केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितले…)
पनवेला-सीएसएमसटी गाड्या अर्ध्या तास उशिराने धावत आहेत. तर दुसरीकडे रस्ते वाहतुकीचा सुद्धा खोळंबा झाला आहे. पूर्व-पश्चिम दोन्ही महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याची माहिती मुंबई ट्राफिक पोलिसांकडून देण्यात आली आहे. यामुळे कामावर जाणारे नागरिक, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
हवामान खात्याचा अलर्ट
मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात येत्या ३ ते ४ तासात जोरदार पाऊस पडेल असा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. येत्या ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असे ट्विट करत हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.