विदेशातील नातलगांची दिवाळी फराळाविनाच! पाकिटे तयार, पण… 

93

दिवाळी म्हटले की जगभरातील भारतीय उत्साही होतात. नोकरी-धंद्यानिमित्ताने तर कुणी शिक्षणासाठी परदेशात रहायला गेलेले भारतीय या सणाच्या निमित्ताने भारतातील आप्त स्वकीयांच्या आठवणीने व्याकुळ होत असतात. मग त्यांच्यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर भारतातून त्यांचे नातलग आठवणीने फराळ पाठवतात. आप्तजनांकडून आलेल्या या प्रेमाचा आस्वाद घेत ही मंडळी सातासमुद्रापलीकडे दिवाळीच्या आठवणीत रमून जातात, यंदा मात्र हे सुखही त्यांना अनुभवता येणार नाही, अशी परिस्थिती आहे.

फराळाचा आनंदही ‘आभासी’ घ्यावा लागणार?

मुंबईतून सध्या विदेशात पाठवण्यासाठीच्या फराळांचे पार्सल मोठ्या संख्येने कुरियर कंपन्यांकडे जमले आहेत. मात्र दुर्दैवाने ते मुंबईतच अडकून पडले आहेत. ते भारताबाहेर गेलेच नाहीत. याला कारण आहे कोरोना! सध्या अमेरिका, ब्रिटेन, दक्षिणेकडील देशांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली कायम ठेवली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवांना तर परवानगी नाहीच, पण कार्गो प्रवासाला परवानगी आहे, मात्र त्यातही सामान घेऊन येणाऱ्या वैमानिकाने देशात पाऊल ठेवताच त्याला विलगीकरणात राहण्याची सक्ती केल्याने वैमानिक परदेशात अडकून पडले आहेत. या एकमेव कारणामुळे कार्गो वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे मुंबईतून परदेशात पाठवण्यासाठी तयार असलेली फराळाची हजारो पाकिटे पडून असल्याचे चित्र सध्या आहे. म्हणून यंदाच्या वर्षी विदेशात राहणाऱ्या भारतीयांना इंटरनेटवरून आपल्या आप्त स्वकीयांसोबत आभासी स्वरूपात फराळाचा आनंद लुटावा लागणार आहे.

(हेही वाचा : नरेंद्र मोदी इटलीमध्ये बोलतात मराठी, गुजराती! कसे आणि कुणाशी? जाणून घ्या…)

अजून ८-१० दिवस लागणार! 

वैमानिकांच्या संबंधी विलगीकरणाच्या नियमामुळे वैमानिकांची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे कार्गो विमानेनुसती उभी आहेत. परदेशात पाठवायची फराळाची पाकिटे आता विमानाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी पुढील ८-१० दिवस तरी ही पाकिटे संबंधितांपर्यंत पोहचण्याची शक्यता कमीच आहे.

नाशवंत पदार्थ पाठवू नका! 

या परिस्थितीमुळे नाशवंत पदार्थ पाठवण्याचा मोह टाळावा, अशी सूचना कुरियर कंपन्या करत आहेत. अन्यथा ते पदार्थ मुंबईतच पडून राहिल्याने खराब होतील, अशी शक्यता कंपन्या व्यक्त करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.