ओमायक्रॉनमुळे सिद्धिविनायक मंदिरही सतर्क! दर्शन नियमात बदल होण्याची शक्यता

73

राज्यात सध्या ओमायक्रोनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्ण संख्याही वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने चिंता व्यक्त केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. त्याकरता रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली, तर सरकार प्रार्थनास्थळांसंबंधीही निर्बंध लावण्याचा विचार करू शकते. त्या आधीच मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास सतर्क बनले आहे. १ जानेवारी २०२३ पासून जर सरकारने मंदिरांसाठी नवीन नियमावली बनवली, तर ती तातडीने अमलात आणण्याची मानसिकता मंदिर प्रशासनाची बनली आहे.

मंदिरांने आधीच घेतली काळजी 

दरम्यान श्री सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने आधीपासूनच कोरोना संसर्गासंबंधी उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी दर्शन व्यवस्था ऑनलाईन करण्यात आली आहे. मागील १५ दिवसांपासून प्रशासनाने ऑफ लाईनही दर्शन व्यवस्था सुरु केली आहे. मात्र ऑफ लाईन येणाऱ्यांनाही मंदिराकडे कोड दिला जातो, त्यानंतरच त्यांना दर्शनासाठी आत सोडले जात आहे.  सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायझिंग या त्रिसूत्रीवर कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. मागील महिनाभरापासून दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या २०-२५ हजारांपर्यंत होती, आता ती ८० हजारांपर्यंत पोहोचली आहे. असे असले तरी आम्ही कोरोना नियमांच्या अंमलबजावणीबाबत अजिबात तडजोड करत नाही, असे श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलतांना सांगितले.

(हेही वाचा ‘एसटी’च्या बडतर्फ कर्मचाऱ्यांवर कारवाई होणारच! परबांची विधानसभेत माहिती)

असे असले तरी मंदिर प्रशासन सतर्क आहे. आम्ही कुणालाही कोडशिवाय मंदिरात प्रवेश देणार नाही. मंदिराच्या बाहेर रांगेत उभे राहणारे भक्त गर्दी करून असतात, त्याठिकाणी भक्तांनीच प्रामाणिकपणे कोरोना नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मात्र कोरोना नियमांचे पालन होते का, ही पाहण्याची जबाबदारी मंदिर प्रशासनाची आहे, असेही राजाराम देशमुख म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.