मुंबईत पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी करताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री ऍड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नालेसफाईची कामे बेभरवशाची आणि अपूर्ण असल्याची गंभीर टिप्पणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, काही ठिकाणी फक्त १० ते ३० टक्के काम झाले असून, ३५ दिवसांत अपेक्षित प्रगती दिसत नाही, हे धक्कादायक आहे.
शेलार (Ashish Shelar) यांनी आज सांताक्रूझ (Santacruz) पश्चिममधील गझदरबांध येथून नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर एस.एन.डी.टी. नाला, ईरला, मोगरा, शाहिद भगतसिंग नगर आदी नाल्यांवरही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि पालिका अधिकारीही उपस्थित होते.
डिजिटल यंत्रणा अपयशी?
नालेसफाईचा व्हिडिओ किंवा फोटो दाखवण्यास अधिकारी अयशस्वी ठरले. मिलेनियम नाल्यावर केलेल्या गाळ सफाईचं प्रत्यक्ष फुटेज किंवा रिकाम्या डंपरचा पुरावा अधिकाऱ्यांकडे नव्हता. ‘स्मार्ट अॅप’ अद्ययावत नसल्याने तांत्रिक तपशीलही सादर होऊ शकला नाही. यामुळे तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका शेलार (Ashish Shelar) यांनी केली.
नालेसफाईतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
“गाळ काढताना नाल्यांची लांबी, रुंदी, खोली कशी मोजली जाते? AI चा वापर खरोखर होतो का? कोणत्या मशीनचा उपयोग होतो?” असे प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले. मात्र यावर प्रशासनाकडे ठोस उत्तर नसल्याचे ते म्हणाले.
(हेही वाचा – प्रीती बंड यांचा Shiv Sena प्रवेश; शिवसेना उबाठाला धक्का)
कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा
“फक्त टीका करून भागणार नाही, कामाची गुणवत्ता आणि वेळेवर पूर्णता आवश्यक आहे. आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करावी,” असा इशारा देत शेलार यांनी कंत्राटदारांना (Contractor) पाठीशी न घालण्याचे आदेश दिले. कामात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई होईल, असेही ते म्हणाले.
मुंबईकरांची सुरक्षितता आणि पावसाळ्यातील त्रास टाळण्यासाठी नालेसफाईची कामे वेळेत, पारदर्शक आणि दर्जेदार व्हावीत, यासाठी सरकारकडून यंत्रणा सज्ज केली जाणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community