
-
मुंबई (सचिन धानजी)
मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत नालेसफाईचे काम तब्बल ३७ टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका (BMC) प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, या नालेसफाई अंतर्गत माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात तुंबणाऱ्या पाण्याला कारणीभूत ठरणाऱ्या दादर धारावी (Dadar Dharavi) नाल्याच्या सफाईला मागील ३ एप्रिल रोजी सुरुवात झाली आणि या सफाईसाठी दादरच्या दिशेने मशिनही नाल्यात उतरवण्यात आली होती. मात्र, नाल्याचा अर्धा किलोमीटरच्या परिसरात आजही सफाई झालेली नसून नाल्यात उतरलेले वाहन गेले कुठे? अदृश्य झाले का असा येथील नागरिकांना पडू लागला आहे. तब्बल महिन्या भरापूर्वी हे वाहन सफाईसाठी नाल्यात उतरूनही या नाल्याची सफाई न झाल्याने केवळ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी हे केले जाते की खरोखरच सफाई केले जाते असा सवाल उपस्थित केला जात आहे.
(हेही वाचा – Haji Ali Pumping Station चे पंप खराब, तब्बल २७८ कोटी रुपये केले जाणार खर्च)
दादर धारावी (Dadar Dharavi) नाल्याच्या सफाईला सुरुवात केल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी प्रत्यक्षात या नाल्याची सफाईच अद्याप झालेली नाही. या नाल्याच्या शेजारी कमला रामन नगर वसाहत, माटुंगा पश्चिम रेल्वे अधिकारी वसाहत तसेच पुढील बाजुस मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) वसाहत आणि आझाद नगर, मेघवाडी आदी वसाहती येत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या नाल्याला जोडणाऱ्या उपनाल्यांमुळे आसपासच्या परिसरात पाणी तुंबण तसेच रेल्वे मार्गावर पाणी तुंबणे असे प्रकार घडत असतात. माटुंगा रेल्वे स्थानक परिसरात तुंबणाऱ्या पाण्यामुळे या नाल्याची सफाई ही महत्वाची मानली जाते आणि नाल्यामुळे कमला रामन नगर वसाहतीतील प्रत्येक घरात पाणी शिरुन त्यांचे संसार वाहून जात असतात. परंतु प्रत्येक वेळी या नाल्याच्या सफाईचा प्रश्न उपस्थित होत असतो. बऱ्याचदा नाल्यातील गाळ बाजुला करुन ठेवला जातो किंवा पुढे ढकलून आणून बाहेर काढला जातो.
परंतु यंदा २ एप्रिल रोजीच या नाल्यात मशिन उतरवले गेले होते, तशी छायाचित्रेही पर्जन्य जलवाहिनी विभागाचे शहराचे उपप्रमुख अभियंता यांना कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी पाठवले होते. परंतु आजतागायत नाल्यात उतरलेले हे वाहन पुढील भागांत कुणाला दिसले नाही कि या भागातील सफाई झाल्याचे कुठे दिसून आले नाही. त्यामुळे या माटुंगा पश्चिम येथील या नाल्याची सफाई (Drain cleaning) खरोखरच कंत्राटदाराला करायची आहे की या वस्तीत पाणी शिरुन लोकांचे संसार वाहून जावे अशी अधिकाऱ्यांची इच्छा आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येथील भागांमध्ये जर पावसाळ्यात पाणी शिरल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत असून महापालिका (BMC) अधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community