Coastal Road : कोस्टल रोड आणि सी-लिंक यांचे वरळीतील टोक असे जोडणार…

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका ११ मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

4030
Coastal Road : कोस्टल रोड आणि सी-लिंक यांचे वरळीतील टोक असे जोडणार...
मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्प शुक्रवार, २६ एप्रिल २०२४ रोजी आणखी एक आव्हानात्मक टप्पा गाठणार आहे. मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) शुक्रवारी पहाटे प्रवाहकीय हवामानानुसार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आव्हानात्मक मोहिमेसाठी साधारणपणे पाच ते सहा तासांचा अवधी लागणार असून यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि तांत्रिक पथक सज्ज आहे. या द्वारे आता मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील टोक जोडण्यात येणार आहे. (Coastal Road)
मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच नरिमन पॉइंटपासून वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात येत आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका ११ मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. ही तुळई (गर्डर) नवी मुंबईतील न्हावा बंदरातून प्रवास करीत वांद्रे-वरळी सागरी सेतू ज्या ठिकाणी मुंबई किनारी रस्त्याला जोडला जाणार आहे, तिथपर्यंत पोहोचली आहे. २५ हजार मेट्रीक टन वजन असलेल्या बार्जवरून ही तुळई आणली आहे. यानंतर मे २०२४ अखेरपर्यंत उत्तर वाहिनी दुसरी मार्गिकेची तुळईची देखील जोडणी करण्यात येणार आहे. ही दुसरी तुळई सध्या न्हावा बंदरात आहे. शुक्रवारी पहिली तुळई जोडल्यानंतर दुसरी तुळई आणून नंतर जोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. (Coastal Road)

अशी आहे पहिली तुळई

पहिली तुळई ही वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात येणार आहे. ही तुळई दोन हजार मेट्रीक टन वजनाची आहे. तसेच १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. जॅकचा वापर करून स्थापन केली जाणारी ही तुळई वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि मुंबई किनारी मार्गाच्या नरिमन पॉईंटकडे जाणाऱ्या बाजूला सांधणार आहे. (Coastal Road)

मे महिन्यात दुसऱ्या तुळईची स्थापना

मुंबई किनारी मार्गावरून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गावर दुसरी तुळई देखील स्थापन करण्यात येणार आहे. ही दुसरी तुळई अडीच हजार मेट्रीक टन वजनाची आहे. तसेच १४३ मीटर लांब आणि २६ ते २९ मीटर रुंद आहे. ही तुळई स्थापन केल्यानंतर मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू पूर्णपणे जोडले जाणार आहेत. (Coastal Road)

निरनिराळ्या टप्प्यांवर घेतली जाते खबरदारी 

देशामध्ये प्रथमच समुद्रामध्ये १३६ मीटर लांबीचा बो स्ट्रिंग आर्च गर्डर (तुळई) बसविण्यात येत आहे. जगात अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आल्याच्या घटना अत्यंत मोजक्याच आहेत. वरळी येथील क्लिव्हलँड जेट्टीमधून मच्छीमारांच्या नौकानयन मार्गात व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी मोजक्याच सुट्या भागांचे (प्री-फॅब्रिकेटेड) पुलाचे नियोजन व बांधकाम करण्यात आले आहे. ही बांधकामप्रणाली अवलंबत समुद्र व पर्यावरण घटकांना कमीत कमी अडथळा निर्माण होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. या पुलाला समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून व दमट वातावरणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सी-५ गुणवत्ता असलेले गंजविरोधक रंगकाम केले आहे. (Coastal Road)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.