CC Road : काँक्रिटच्या रस्त्यांवरील सांधे भरण्यासाठी डांबर भरण्याचा पर्याय अयशस्वी; अतिरिक्त आयुक्तांनी दिले ‘हे’ निर्देश

387
CC Road : काँक्रिटच्या रस्त्यांवरील सांधे भरण्यासाठी डांबर भरण्याचा पर्याय अयशस्वी; अतिरिक्त आयुक्तांनी दिले 'हे' निर्देश
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्यावतीने आतापर्यंत हाती घेतलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अनेक रस्त्यांचे सांधे भरण्यासाठी डांबराचा वापर केला जात असला तरी प्रत्यक्षात हे सांधे भरण्यासाठी आता हे तंत्रज्ञान वापरणे योग्य नसल्याची बाब समोर आली आहे. सांधे भरण्यासाठी डांबराऐवजी सिलिकॉन सिलेट या द्रावाणाचा वापर करावा असे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे. त्यामुळे यापूर्वी जे काँक्रिटच्या रस्त्यांचे सांधे तसेच तडे भरण्यासाठी डांबराचा वापर केला जात असला तरी आतापर्यंत या तंत्राचा केला जाणारा वापर हा योग्य पर्याय नव्हता हेच यामाध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे यापूर्वी काँक्रिटच्या जुन्या रस्त्यांवरील तडे तसेच सांधे भरण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले ते योग्य होते का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. (CC Road)

रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याआधी तयार केला जाणारा खालचा थर (सब बेस) मजबूत असावा. काँक्रिट थर योग्य पद्धतीने बसावा आणि तडे जाऊ नये म्हणून मजबूत खालचा थर तयार करणे आवश्यक आहे. त्‍यामुळे ‘ड्राय लीन काँक्रिट’ व ‘वेट मिक्स मॅकॅडम’ यांचा स्तर समतल असावा. सहानता (कॉम्‍‍पॅक्‍शन) करताना अधिक दक्ष रहावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी देतानाच सांधे भरण्‍यासाठी डांबराऐवजी ‘सिलिकॉन सिलेंट’ या द्रावणाचा वापर करावा, असे निर्देशही बांगर यांनी दिले. (CC Road)

(हेही वाचा – Water Cut : मुंबईतील ‘या’ भागात येत्या शनिवार आणि रविवारी राहणार पाणीकपात; काय आहे कारण?)

रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने संपूर्ण मुंबईतील रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे वेगाने सुरू आहेत. या अंतर्गत पूर्व उपनगरातील रस्ते काँक्रिटीकरण कामांची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी मंगळवारी २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये, नाहूर पूर्व येथील सेनरूफ मार्ग, भांडुप पूर्व येथील ट्रॉली लाईन मार्ग आणि मुलुंड (पूर्व) गवाणपाडा येथील होली एंजल मार्ग काँक्रिटीकरण कामांचा समावेश आहे. (CC Road)

सांधे भरण्‍यासाठी काही ठिकाणी डांबराचा वापर केला जातो. त्‍याऐवजी ‘सिलिकॉन सिलेंट’ या द्रावणाचा वापर केला तर सांधे अधिक चांगल्‍या पद्धतीने भरले जातात. ते काँक्रिट रंगाशी साधर्म्‍य साधत असल्‍याने दृश्‍य स्‍वरूपातदेखील चांगले जाणवते. महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्‍या काँक्रिटीकरणाच्‍या सर्व कामात याचा वापर शक्‍य आहे का, याची पडताळणी करावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना बांगर यांनी केली. (CC Road)

(हेही वाचा – BMC जिमखान्याच्या जागेवर उभारणार टाऊनहॉल जिमखाना, महालक्ष्मी येथे उभारणार क्रीडाभवन; कसे असेल जाणून घ्या)

डीएलसी आणि पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट यांचे कटिंग जुळावेत

ड्राय लीन काँक्रिट ऐवजी प्लेन सिमेंट काँक्रिट चा वापर होत असेल तर सांध्यांमध्ये (Joints) जास्त अंतर असावे. डीएलसी आणि पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट यांचे कटिंग जुळावेत आणि डीएलसी व वेट मिक्स मॅकॅडम यांचा स्तर समतल असावा, या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या तज्‍ज्ञांनी केलेल्‍या शिफारशींची अंमलबजावणी करावी, असे निर्देशदेखील बांगर यांनी दिले. प्रकल्‍पस्‍थळी कार्यरत दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांच्‍याशी संवाद साधत बांगर यांनी रस्ते काँक्रिटीकरण टप्‍पा १ आणि टप्‍पा २ कामांची माहिती घेतली. सुरू असणारी काँक्रिटीकरण कामे रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱया टोकापर्यंत (एंड टू एंड) पूर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. ३१ मे २०२५ पर्यंत काँक्रिटीकरण कामे पूर्ण करावीत, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले. (CC Road)

(हेही वाचा – Unauthorised Construction वरील कारवाई आता अधिक तीव्र; पावसाळ्यापूर्वीच चालवला जाणार हातोडा)

‘स्प्रिंकलर’ चा वापर करण्‍याऐवजी ‘फॉगिंग’ पद्धतीद्वारे फवारणी

काँक्रिटमध्‍ये टाकले जाणारे मिश्रणाचे घटक म्हणजे रेती, खडी, क्रशर सँड यांसारख्या कणयुक्त (ग्रॅन्युलर) पदार्थांचा समूह, जे सिमेंट आणि पाण्यासोबत मिसळून काँक्रिट तयार करण्यासाठी वापरले जातात, त्‍या मिश्रण घटकांची पाहणी करण्‍यात आली. या मिश्रणावर पाणी फवारणी करण्‍यासाठी ‘स्प्रिंकलर’ चा वापर करण्‍याऐवजी ‘फॉगिंग’ पद्धतीद्वारे फवारणी केली जात होती. ‘फॉगिंग’ पद्धतीमुळे मिश्रणावर समान छोटे थेंब फवारले जात होते. ‘फॉगिंग’ पद्धती अधिक चांगली असल्‍याचे मत भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले. (CC Road)

दरम्यान प्रत्यक्ष कार्यस्थळी स्लम्प चाचणी, क्यूब चाचणी, बार चाचणी आदी विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यांचे परिणाम (रिझल्ट) योग्य असल्याचे निदर्शनास आले. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे सहायक प्रा. सोलोमन देबबर्मा, महानगरपालिकेचे रस्ते व वाहतूक विभागाचे उप प्रमुख अभियंता (पूर्व उपनगरे) संजय सोनवणे यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. (CC Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.