
-
सचिन धानजी, मुंबई
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्वच रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटची कामे हाती घेण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र या कामांमध्ये सुसुत्रता नसल्याचे दिसून येत आहे. रस्ते सिमेंट काँक्रिटच्या कामांमध्ये पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या बनण्याच्या कामाला प्रथम सुरुवात होऊन नंतर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेणे आवश्यक मानले जाते. परंतु चिकूवाडीतील जॉगर्स पार्क रस्त्याचे काम मागील पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्यानंतर आता येथील रस्त्यालगतच्या गटाराचे बांधकाम करण्यात येत आहे. शिवाय हिच स्थिती येथीलच पद्मा नगर येथील रस्त्याची आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर गटाराची कामे केली जात असल्याने आता या सर्व रस्त्यांची पाहणी काटेकोरपणे केली जात असल्याने यात गटाराचे काम केले नाही ही बाब समोर येऊ नये या भीतीने आता केली जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. (CC Road)
मुंबईतील सर्व रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी मागील वर्षी सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या निविदा काढून कंत्राटदारांची निवड केली. मात्र, पहिल्या टप्प्यात नेमलेल्या कंत्राटदारांकडून दोन वर्षांमध्ये ही कामे केली जातील असा दावा महापालिका आयुक्तांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्याअंतर्गत महापालिकेच्या परिमंडळ सातमधील आर मध्य, मध्य उत्तर आणि आर दक्षिण विभागासाठी एक स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये आर मध्य विभागातील चिकूवाडी येथील जॉगर्स पार्क जवळील रस्त्यांचे मागील पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले होते. परंतु पहिल्याच पावसात या रस्त्यावरील काही भागांमधील खडीच वाहून जात तो भाग खराब झाला असल्याची बाब समोर होती. (CC Road)
(हेही वाचा – राज्यात १२१ Ola Showroom होणार बंद; नेमकं काय कारण? वाचा)
चिकूवाडीतील जॉगर्स पार्क रस्त्यावरील शिवसेना उबाठा शाखा क्रमांक १७ आणि सोनीपार्क सी व डी विंगसमोरील व विनस इमारतीच्या प्रवेशमार्गासमोरील नव्याने सिमेंट काँक्रिट केलेल्या रस्त्यावरील खडी वाहून जात हा भाग खराब झाला आहे. तब्बल ५० मीटर परिसरातील रस्त्यावरील खडी वाहून गेली होती आहे. तसेच लिंक रोड करून येणारा मार्ग जिथे जोडला जातो त्याच जंक्शनलाच सांधा खचला गेल्याने तिथे खड्डाही पडला गेला होता. परंतु त्याची पुढे डागडुजी करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आजही एक वर्षांपूर्वी बनवलेला रस्ता आता अनेक वर्षांपूर्वी बनवलेला असेल अशाप्रकारे दिसून येत आहे. (CC Road)
मात्र, हा रस्ता बनवताना रस्त्यालगत पावसाळी पाणी वाहून नेण्याऱ्या गटाराचे बांधकाम करण्यात आले होते. ते काम आता सुरु करण्यात आले. जॉगर्स पार्कच्या या रस्त्यावरील व्हिनस अपार्टमेंट ते व्हिनस एव्हेन्यू या दरम्यान शिवसेना उबाठा क्रमांक १७ च्या शाखेसमोर रस्त्यालगत गटाराचे काम सुरु आहे. परंतु या रस्त्याचे काम जर एक वर्षांपूर्वी पूर्ण झाले तर रस्ता बनवण्यापूर्वी या गटाराचे बांधकाम का करण्यात आले नाही असा सवाल केला जात आहे. सर्वसाधारणपणे जर रस्त्याचे बांधकाम करण्यापूर्वी गटाराचे बांधकाम करणे हे आवश्यक असते तर या रस्त्याच्या कामांत एक वर्षांनंतर येथील गटार बांधण्याची आठवण कशी झाली असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. या गटाराचे बांधकाम करताना येथील झाडांची मुळांनाही धोका पोहोचवून त्यावरही सिमेंट टाकल्याचे दिसून येत आहे. (CC Road)
(हेही वाचा – IPL 2025, Virat Kohli : विराट कोहलीचा टी-२० मध्ये नवा विक्रम; ‘या’ बाबतीत पाकच्या बाबर आझमला टाकलं मागे)
अशीच परिस्थिती चिकुवाडीतील पद्मा नगर रस्त्याची आहे. या रस्त्याच्या एका भागाचे काम पूर्ण झाले असून चिकूवाडी शेअर रिक्षा स्टॅडपासून पुढील लिंक रोडपर्यंतचे काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु पद्मा नगर येथील रस्त्याचे काम तीन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आल्यानंतरही लक्ष्मी इमारतीच्या समोरील पदपथाजवळील पावसाळी पाणी निचरा करण्यासाठी गटाराचे बांधकाम करण्यात येत आहे. येथील दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, या गटाराचे बांधकाम काही महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते आणि गटार लाईन योग्य होती, परंतु आता या रस्ते कामानंतर पुन्हा खोदून नव्याने बनवण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामांपूर्वी या गटाराचे बांधकाम हाती का घेण्यात आले नाही असा सवाल दुकानदारांकडून केला जात असून जर यंदाच्या पावसाळ्यात पाणी तुंबले गेले तर याला जबाबदार कोण असाही सवाल त्यांच्याकडून केला जात आहे. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community