
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
रस्त्यांची कामे आटोपती घेत असताना पावसाळ्यादरम्यान मुंबईकर नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, याचा पुनरूच्चार करताना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी, काँक्रिट रस्त्याची “राइडिंग क्वालिटी म्हणजे वाहनचालकाला किंवा प्रवाशांना रस्त्यावरून प्रवास करताना होणारा अनुभव सुखद असावा. पावसाळ्यादरम्यान रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा रस्तारोधक राहणार नाही, हे सुनिश्चित करावे, अशा सूचना केल्या. तसेच रस्ता रोधक अर्थात बॅरिकेड्स काढून रस्ता वा रस्त्याच्या आजूबाजूला न टाकता कंत्राटदाराने ती थेट गोदामात न्यावीत. रस्ता आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही हे सुनिश्चित करावे, असे स्पष्ट निर्देश बांगर यांनी दिले. (CC Road)
महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी २२ मे २०२५ रोजी रात्री शहर विभागातील रस्ते कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये, ए विभागातील रामनाथ गोयंका मार्ग, नौरोजी हिल मार्ग क्रमांक ९, दुमायने मार्ग, बी विभागातील माऊजी राठोड मार्ग, सी विभागातील आर. एस. सप्रे मार्ग आणि जी दक्षिण विभागातील नवीन प्रभादेवी मार्ग आदींचा समावेश होता. रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत कामे पूर्णत्वास येत आहेत. रस्तेबांधणीची अखेरची कामे काळजीपूर्वक करून घेण्यासाठी सर्वांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी हजर राहावे. दुमायने मार्ग येथे रस्त्याच्या खाली ३०० मिलीमीटर रूंदीचे ८ डक्ट टाकण्यात आले आहेत. सामान्य परिस्थितीत २ डक्ट टाकण्यात येतात. मात्र, विद्युत वाहिन्यांची संख्या अधिक असल्याने ८ डक्ट टाकावेत, अशी विनंती बृहन्मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय अॅण्ड ट्रान्सपोर्टच्या वतीने करण्यात आली होती. हे काही आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. या कामाची बांगर यांनी पाहणी केली. (CC Road)
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा घेतला समाचार; म्हणाले, काँग्रेसच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस…)
यानंतर नौरोजी हिल मार्ग क्र. ९ येथील कामाची पाहणी करण्यात आली. हा रस्ता पूर्णत्वास आला आहे. या ठिकाणी रस्तेबांधणीची अखेरची कामे काळजीपूर्वक करून घेण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या. रामनाथ गोयंका मार्ग येथील सुरू असलेल्या कामांचीही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी अखेरच्या टप्प्यातील कामे सुरू आहेत. पाऊस असल्यामुळे दिनांक २० मे २०२५ रोजी होणारी पीक्यूसीची कामे होऊ शकली नाहीत. हे पीक्यूसी पावसाने उघडीप दिल्याने करण्यात येत आहेत. पीक्यूसीनंतर हा रस्ता पूर्ण होणार आहे. अशा ठिकाणी ‘अर्ली स्ट्रेन्थ काँक्रिट’ वापरून सात दिवसांत क्यूरिंग पूर्ण करण्यात येणार आहे. न्यू प्रभादेवी मार्ग येथे डीएलसी आज झाले आहे आणि डीएलसीचा कालावधी पूर्ण होऊन पीक्यूसी करणे शक्य नाही त्यामुळे हा रस्ता मास्टिकमध्ये पूर्ण करून जंक्शनला जोडावा, असा निर्णय घेण्यात आला. जणेकरून दिनांक ३१ मे २०२५ पूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. (CC Road)
पेव्हमेंट क्वॉलिटी काँक्रिट केल्यानंतर एक तृतीयांश भागात जॉईंट कटिंग केले जाते. त्यामुळे जो दोन तृतीयांश भाग राहतो, त्यात नैसर्गिकरित्या तडा (Joint Cracks) जाणे आवश्यक असते. जेणेकरून त्याचा आजूबाजूचा भाग संरक्षित राहतो. ही तांत्रिक बाब अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, काही वेळा जॉईंटच्या खालच्या भागात नैसर्गिकरित्या तडा जात नाही. त्याठिकाणी ‘क्युरिंग’चे सात दिवस पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट पद्धतीने भारवाहक मालट्रकचे वहन केल्यानंतर भेगा कार्यशील केल्या जाऊ शकतात, जेणेकरून आजूबाजूच्या जागा संरक्षित राहू शकतात, असे मतप्रदर्शन भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांनी केले. त्याची दखल घेऊन, अभिजीत बांगर यांनी रस्ते विभागाच्या सर्व अभियंत्यांना याबाबतच्या सूचना निर्गमित करण्याचे निर्देश दिले. यावेळी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे सहायक प्रा. सोलोमन देबबर्मा, महानगरपालिकेचे रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता गिरीश निकम यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community