-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईमध्ये सध्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरु असून या कामांमध्ये अल्टा थिन व्हाईट टॉपिंग अर्थात युटीडब्ल्यूटीचा वापर फारच कमी करण्यात आला आहे. या तंत्राचा वापर करण्यास अधिक महत्व न देणाऱ्या महापालिका प्रशासनाला आता या तंत्राची वापर करण्याचे शहाणपण सुचले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी आता पारंपरिक काँक्रिटीकरण समवेत ‘अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग’ (यूटीडब्ल्यूटी) पद्धतीचाही शक्य तिथे अवलंब केला पाहिजे, अशी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. (CC Road)
मुंबईत सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. ३१ मे २०२५ पूर्वी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णत्वास जावे, यासाठी सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करण्यात आले आहे. प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्याची निश्चित तारीख ठरविण्यात आली आहे. या अंतर्गत घाटकोपर (पूर्व) येथील श्रीमद् राजचंद्र ज्ञानमंदिर मार्ग, कुर्ला (पूर्व) येथील शिवसृष्टी मार्ग या पूर्णत्वास आलेल्या रस्त्यांची तर घाटकोपर पूर्वमध्ये विद्याभवन मार्ग आणि घाटकोपर (पश्चिम) येथील संघानी इस्टेट मार्ग येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामाची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी मंगळवारी २९ एप्रिल २०२५ रोजी रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. याप्रसंगी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे सहायक प्रा. सोलोमन देबबर्मा, महानगरपालिकेचे रस्ते व वाहतूक विभागाचे उपप्रमुख अभियंता (पूर्व उपनगरे) संजय सोनवणे यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. (CC Road)
(हेही वाचा – ‘वन स्टॉप क्रायसिस सेंटर’ आणि ‘सायबर वेलनेस’ केंद्राचीही BMC ने केली स्थापना; काय असेल या केंद्राचे कार्य?)
मुंबईत सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत, ज्या ठिकाणी काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत, त्या ठिकाणी थर्मोप्लास्ट रेषांकन, परावर्तक रस्ता खुणा, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, चौकातील जाळीदार चिन्हांकन यांसारखी अंतिम कामे तातडीने पूर्ण करून संबंधित रस्त्यांवर वाहतूक सुरू करावी, तसेच परिसर सुशोभीकरणात भर घालावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. (CC Road)
घाटकोपर (पश्चिम) येथील संघानी इस्टेट मार्गाची थीन व्हाईट टॉपिंग (टीडब्ल्यूटी Thin White Topping) पद्धतीद्वारे बांधणी करण्यात येत आहे. व्हाईट टॉपिंग ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये जुन्या डांबरी रस्त्यावर एक पातळ (थीन) किंवा जाड (थीक) काँक्रिटचा थर घालून रस्त्याचे मजबुतीकरण केले जाते. ज्यामुळे रस्ता अधिक टिकाऊ, मजबूत आणि दीर्घकालीन होतो. पारंपरिक काँक्रिटीकरण करताना एम ४० तर व्हाईट टॉपिंगसाठी एम ६० ग्रेड काँक्रिटचा वापर केला जातो. तसेच, पारंपरिक काँक्रिटीकरण करताना खालील थर नव्याने करणे आवश्यक असते. मात्र, व्हाईट टॉपिंग पद्धतीत जर मूळ डांबराचा थर चांगला असेल तर नव्याने थर करण्याची आवश्यकता भासत नाही. तसेच, पारंपरिक काँक्रिट पद्धतीत १४ दिवसांचा तर व्हाईट टॉपिंग पद्धतीत ७ दिवसांचा ‘क्युरिंग’ कालावधी लागतो. एकूणच, व्हाईट टॉपिंग पद्धतीत कामे जलद गतीने होतात. तसेच, मूळ काँक्रिटच्या तुलनेत कमी खर्च येतो. याचा विचार करता पारंपरिक काँक्रिटीकरण समवेत अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग (यूटीडब्ल्यूटी) पद्धतीचा देखील शक्य तिथे अवलंब केला पाहिजे, अशी महत्वपूर्ण सूचना बांगर यांनी केली. पारंपरिक काँक्रिटीकरण आणि व्हाईट टॉपिंग पद्धतीने रस्ते बांधणीसाठी लागणारा आवश्यक कालावधी, खर्च यांची तुलना करता अधिकाधिक रस्ते व्हाईट टॉपिंग पद्धतीने विकसित करता येऊ शकतील, असे बांगर यांनी नमूद केले. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community