CC Road : मुंबईत दोन वर्षांत ७७१ रस्त्यांची सिमेंट काँक्रिटची कामे झाली पूर्ण; ६१४ रस्ते राहिले अर्धवट

148
CC Road : मुंबईत दोन वर्षांत ७७१ रस्त्यांची सिमेंट काँक्रिटची कामे झाली पूर्ण; ६१४ रस्ते राहिले अर्धवट
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्‍त्‍यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत, ७७१ रस्त्यांचे एकूण १८६ किलोमीटर लांबीचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर, ६१४ रस्त्यांवर चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदी पर्यंत याप्रमाणे मिळून एकूण १५६.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व रस्‍ते वाहतुकीस खुले करण्‍यात आले आहेत. निर्धारित कालमर्यादेत, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करुन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. (CC Road)

मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या मार्गदर्शनात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी व्यापक नियोजन करुन सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. त्‍यामुळे रस्ते प्रवास अधिक सुकर होणार आहे. काँक्रिट रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परिरक्षणाचा खर्चही कमी होणार आहे. तसेच, काँक्रिट रस्ते दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होणार आहे. त्‍याचे दूरगामी सकारात्‍मक परिणाम दिसून येणार आहेत. (CC Road)

(हेही वाचा – अपघातानंतर डीजीसीएचे निर्देश; एअर इंडियाच्या Boeing Aircraft ची सखोल तपासणी सुरु)

महत्त्वाकांक्षी अशा रस्‍ते काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत टप्पा एक आणि टप्पा दोनमध्ये एकूण मिळून २,१२१ रस्ते कामांचे नियोजन करण्यात आले, ज्‍यामध्‍ये ६९८.४४ किलोमीटर लांबीच्‍या रस्‍त्‍यांचा समावेश आहे. पैकी, ३१ मे २०२५ अखेर ठरलेल्या मुदतीत १,३८५ रस्त्यांची मिळून ३४२.७४ किलोमीटरची कामे पूर्ण करण्‍यात आली आहेत. म्हणजेच पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ४९.०७ इतकी आहे. एकूण १८६ किलोमीटर लांबीचे ७७१ रस्‍ते एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत पूर्ण झाले आहेत. तर, १५६.७४ किलोमीटर लांबीच्‍या ६१४ रस्‍त्‍यांचे काम चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदीपर्यंत पूर्ण झाले आहे. (CC Road)

काँक्रिटीकरण पूर्ण झालेल्‍या रस्‍त्‍यांवर कोणत्‍याही संस्‍थेस खोदकाम, चर करायला मनाई करण्‍यात आली आहे. तसेच, महानगरपालिकेतर्फे खोदकामास परवानगी दिली जाणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. सद्यस्थितीत रस्ते कामाचा राडारोडा, बांधकाम साहित्य, रस्तारोधक (Barricades) हटविण्‍यात आले असून रस्ते संपूर्णत: वाहतुकीस खुले करण्‍यात आले आहेत. रस्‍त्‍यालगतच्‍या पर्जन्य जलवाहिन्या देखील स्वच्छ करण्यात आल्या आहेत. विभाग कार्यालयांकडून रस्त्यांवरील अधिकृत गतिरोधकांची यादी प्राप्त झाल्‍यानंतर गतिरोधकांची पुनर्बांधणी करण्‍यात येणार आहे. (CC Road)

(हेही वाचा – Iran – Israel War मध्ये इराण जगाच्या नकाशावर पडला एकाकी; जाणून घ्या कशी आहे इराणची ‘दहशतवादी’ प्रतिमा)

टप्‍पा १ मधील रस्त्यांची हाती घेतलेली कामे
  • एकूण किलोमीटर : ३२०.०८ किलोमीटर लांब
  • रस्त्यांची संख्या : ७००
  • पूर्ण केलेल्या रस्त्यांचे किलोमीटर : १०१.६७ किलोमीटर लांब
  • पूर्ण केलेल्या रस्त्यांचे बांधकाम : ३४३ रस्ते
  • चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदी पर्यंत केलेले रस्ते : २३९ रस्ते
  • त्याची किलोमीटर लांबी : १०१ .६८ किलोमीटर लांब
  • एकूण पूर्ण झालेल्या ररस्त्याची कामे : एकूण ७०० पैकी ५८२ रस्‍ते
  • एकूण पूर्ण झालेल्या रस्त्याचे किलोमीटर : २०३.३६ किलोमीटर आहे.
  • काम पूर्ण झाल्याची टक्केवारी : निश्चित केलेल्‍या उद्दिष्‍टापैकी ६३.५३ टक्‍के
टप्‍पा २ मधील रस्त्यांची हाती घेतलेली कामे
  • एकूण किलोमीटर : ३७८.३६ किलोमीटर लांब
  • एकूण रस्त्यांची संख्या : १४२१
  • पूर्ण केलेल्या रस्त्यांची संख्या : ८०३ रस्ते
  • पूर्ण झालेल्या रस्त्याचे किलोमीटर : ८४.३३ किलोमीटर लांब
  • एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पूर्ण झालेले रस्ते संख्या : ४२८ रस्ते
  • चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदीपर्यंत केलेल्या रस्त्याचे किलोमीटर : ५५.०६ किलोमीटर लांब
  • या अंतर्गत रस्त्याची कामे झालेल्या रस्त्यांची संख्या : एकूण ३७५ रस्‍त्‍यांचे काम
  • ३१ मे २०२५ पर्यंत एकूण पूर्ण झालेल्या रस्त्याचे किलोमीटर : १३९.३८ किलोमीटर लांब
  • या अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झालेल्या रस्त्यांची संख्या: ८०३ रस्‍ते
  • काम पूर्ण झाल्याची टक्केवारी : निश्चित केलेल्‍या उद्दिष्‍टापैकी ३६.८४ टक्‍के

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.