-
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण (CC Road) कामांना आता चांगलाच वेग आला आहे. प्रगतिपथावर असणारी बहुतांशी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून, खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यासाठी महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न आहेत. या नियोजनानुसार अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्त्यांची (CC Road) कामे पूर्णत्वास आली आहेत. या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी मुंबईत दरदिवशी तब्बल पावणे चारशे रेडी मिक्स काँक्रिट मिक्सरच्या वाहनांची ये जा सुरु असते,अशी आकडेवारी आता समोर आली आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) खड्डेमुक्त रस्ते तयार करण्याचे ध्येय ठेवून, सिमेंट काँक्रिट रस्ते (CC Road) तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. काँक्रिट रस्ते डांबराच्या रस्त्यांपेक्षा अधिक काळ टिकतात. ते अवजड वाहतुकीला आणि हवामानातील बदलांना जास्त चांगले तोंड देतात. एकदा का काँक्रिट रस्ता तयार झाला, तर त्याची देखभाल दुरुस्ती करायचा खर्च फार कमी असतो आणि वेळोवेळी दुरुस्तीची गरजही कमी भासते. मुंबईतील भौगोलिक स्थिती, पर्जन्यमान, वाहतुकीचा भार इत्यादी बाबी लक्षात घेता डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंट काँक्रिटचे रस्ते (CC Road) हा अधिक चांगला पर्याय ठरतो आहे.
(हेही वाचा – महाराष्ट्रातून ताबडतोब चालते व्हा; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा पाकिस्तानी नागरिकांना इशारा)
यंदाच्या पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मे २०२५ पर्यंत अधिकाधिक रस्ते काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे लक्ष आहे. काँक्रिट कामाचा दर्जा अत्युच्च असावा याकडे काटेकोर लक्ष दिले जात आहे. गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासण्या केल्या जात आहेत.
महानगरपालिकेचे सर्वच वरिष्ठ अधिकारी शहर आणि पूर्व तसेच पश्चिम उपनगरांमधील प्रत्यक्ष कार्यस्थळास सातत्याने आणि वारंवार भेट देऊन पाहणी करत आहेत. तसेच विविध निर्देश देत आहेत. आकस्मिक पाहणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यास आर्थिक दंड ठोठावण्यासह कठोर प्रशासकीय कारवाईही करण्यात येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमधील अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे पूर्णत्वाकडे पोहोचली आहेत. १७ एप्रिल २०२५ ते २३ एप्रिल २०२५ या ७ दिवसांच्या कालावधीत तब्बल १८ हजार ५६० घनमीटर उच्च प्रतीचे सिमेंट काँक्रिट (पीक्यूसी) वापरून रस्ते तयार करण्यात आले आहेत. मागील सात दिवसात २ हजार ६५० रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर वाहनांचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच दररोज सरासरी ३७८ रेडी मिक्स काँक्रिट मिक्सर (Ready mix concrete mixer) वाहनांमधुन पेव्हमेंट क्वालिटी कॉंक्रिटचा पुरवठा झाला असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community