-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाबाबत (Carnac Railway Flyover) निश्चित केलेल्या कालमर्यादेत म्हणजेच पुढील ५३ दिवसांत पुलाची सर्व कामे पूर्ण करावीत. कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सक्त ताकीद अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी यांनी कंत्राटदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना दिली. या पुलाचे काम १० जून २०२५ पर्यंत पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा, यादृष्टीने नियोजन करावे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी १८ एप्रिल २०२५ रोजी प्रकल्पस्थळास भेट देत उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच आवश्यक ते निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
(हेही वाचा – IPL 2025, RCB vs PBKS : रजत पाटीदारने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम)
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल (Carnac Railway Flyover) महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. रेल्वे मार्गावर तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून टप्पानिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्व आणि पश्चिम दिशेचे काम प्रगतिपथावर आहे.
कर्नाक उड्डाणपूल (Carnac Railway Flyover) १० जून २०२५ पर्यंत वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन आहे. म्हणजेच पुढील ५३ दिवसांच्या कालावधीत उर्वरित सर्व कामे पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुलाच्या पश्चिम दिशेकडील कामे आटोक्यात आली आहेत. मात्र, पूर्व दिशेकडील कामांची गती वाढवणे आवश्यक आहे. पूर्व दिशेला ८ खांब पूर्ण झाले असून आधारभूत संरचना (पेडेस्टल) स्तरावर काम सुरु आहे. ४० पैकी ५ लोखंडी तुळया (गर्डर) प्रकल्पस्थळी आल्या आहेत. यापुढील काळात पेडेस्टल आणि बेअरिंगचे काम समांतरपणे करण्यात यावे, असे निर्देश बांगर यांनी दिले.
(हेही वाचा – उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर मंत्री Nitesh Rane यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, स्वत:च्या अस्तित्वासाठी…)
सर्व लोखंडी तुळई दिनांक २७ एप्रिल २०२५ पर्यंत प्रकल्पस्थळी उपलब्ध व्हाव्यात. २ मे २०२५ पर्यंत तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. ५ जून २०२५ पर्यंत दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते (ॲप्रोच रोड) तयार करण्यात यावेत. ७ मे २०२५ पर्यंत रेल्वे भागातील काँक्रिटीकरण पूर्ण करावे. जेणेकरून काँक्रिट क्युरिंगचा कालावधी व उर्वरित कामे लक्षात घेता दिनांक १० जून २०२५ पर्यंत पुलाच्या मुख्य वाहतूक मार्गाचे काम पूर्ण केले जाऊ शकते, असे बांगर यांनी नमूद केले.
दमण स्थित फॅब्रिकेशन प्रकल्प येथून लोखंडी तुळई आणण्यात येणार आहेत. त्या विहित कालावधीत प्रकल्पस्थळी याव्यात, यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. पूल विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी प्रकल्पस्थळास वेळोवेळी भेट देऊन पाहणी करावी. तसेच काम गुणवत्तापूर्ण व नियोजित वेळेत होत असल्याची खातरजमा करावी, असे निर्देश देखील बांगर यांनी दिले आहेत. (Carnac Railway Flyover)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community