Byculla Zoo : प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होत आहेत, कारण…

182

शंभर वर्षांपूर्वी माणूस जंगलात जाण्यास घाबरत होता. मात्र हल्ली माणसांचा जंगलात इतका हस्तक्षेप वाढला आहे की, त्यामुळे प्राणीच जंगलात घाबरत आहेत. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, वनस्पतींच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. याला माणसांची वाढती लोकसंख्या व जंगलात केलेले अतिक्रमण जबाबदार आहे. यावर वेळीच ठोस निर्णय व्हायला हवा, असे मत ‘एलिफंट मॅन’ तथा पद्मश्री डॉ. के.के. सरमा यांनी व्यक्त केले.

वन्यजीव सप्ताह २०२३ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (Byculla Zoo) यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आण्णा भाऊ साठे नाट्यगृहात बुधवारी ४ ऑक्टोबर २०२३ सकाळी मुख्य समारंभ पार पडला. यावेळी पालकमंत्री बोलतांना सरमा यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना पर्यावरणाचा मानवी जीवनाशी असलेला संबंध उलगडून दाखविला. हत्तींचे पालनपोषणाबाबतचे अनुभव कथन केल्यानंतर प्राणी, पक्षी यांच्या अधिवासाला धक्का लावू नका, असे आवाहनही त्यांनी अखेरीस केले.

bmc1 1

दर शनिवार, रविवारी सहल आयोजित करा

मुंबईसारख्या महानगरात मुलांचा निसर्गाशी संबंध येणे खूप गरजेचे आहे. निसर्ग, पर्यावरण, पर्यावरणातील घटक त्यांना जवळून पाहता यावेत यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घ्यायला हवेत. त्यासाठी मुंबई महानगरपालिका प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना बेस्ट बसेसच्या माध्यमातून दर शनिवारी आणि रविवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (Byculla Zoo) तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे न्यायला हवे, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महानगरपालिका शिक्षण विभागाला दिले आहेत.

(हेही वाचा Share Market : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, वाचा कोणते वधारले आणि बुडाले…)

राणीबागेत लवकरच डबलडेकर बसची सुविधा

प्राणी आणि मनुष्य यांच्यात एक नातं असते. वाढत्या शहरीकरणात आपण हे नाते टिकवायला हवे. त्यात उद्याने, बगीचे यांचा मोठा वाटा आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या पुनर्वसनात महानगरपालिका प्रशासनाचा मोठा वाटा आहे. या उद्यानातील प्राणी-पक्षी नीट पाहता यावेत म्हणून लवकरच येथे डबल डेकर बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री लोढा यांनी रंगविले चित्र

‘वन्यजीव सप्ताह’निमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (Byculla Zoo) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा सकाळी नऊ वाजेपासून सुरू होती. या स्पर्धला कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी चित्र रंगविणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच काही चित्रांमध्येही रंग भरले. तत्पूर्वी आज सकाळी उद्यानातील बँडस्टँड येथे पार पडलेल्या चित्र रंगवा स्पर्धेत मंगल प्रभात लोढा यांनीही भेट दिली आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

या कार्यक्रमाला स्थानिक आमदार यामिनी यशवंत जाधव, ‘एलिफंट मॅन’ तथा पद्मश्री डॉ. के. के. सरमा, सह आयुक्त (शिक्षण) गंगाथरण डी., शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, सोनल केसरकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचा गौरव

या कार्यक्रमाचे औचित्य साधून उद्यानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यात अक्षय राणे (प्रथम), आशिष तांबे (द्वितीय), इसरार खान (ततीय) यांचा समावेश होता. याशिवाय वाघ प्रदर्शनी येथे वाघांची काळजी घेणारे अमोल शिंदे आणि उन्हाळी सुटीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील ‘एमसीए’च्या १४ सेंटरमध्ये संधी उपलब्ध करून देणारे भालेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात उद्यानाच्या माहिती पुस्तिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा, झाडे वाचवा, असा संदेश देणारी नाटिका सादर केली. तसेच ‘मी राणीची बाग बोलतेय’, ‘प्लास्टिक बंदी’, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही चित्रफितही यावेळी दाखविण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.