
-
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील (Vikhroli Railway Station) उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामे शेवटच्या टप्प्यात आली वाहतूक विभागासमवेत समन्वय साधून लवकरच हे दोन्ही पूल (Bridge) वाहतुकीस खुले करण्यात येणार आहेत. या दोन्ही पुलांचे काम पुर्णत्वास आल्याने लवकरच लोकार्पणासाठी पंचागमध्ये मुहुर्ताची तारीख शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मुंबई महानगरातील वाहतूक सुरळीत राहावी या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेमार्फत (BMC) विविध रस्त्यांवर उड्डाणपूल, रेल्वे मार्गावर उड्डाणपूल, पादचारी पूल, आकाश मार्गिका आदींची उभारणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या पूल विभागाने काही नवीन पुलांचे (Bridge) बांधकाम केले आहे तर आणखी काही पुलांच्या बांधणीची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यात कर्नाक रेल्वे उड्डाणपूल आणि विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलाचा देखील समावेश आहे.
(हेही वाचा – Shiv Sena : आदित्य ठाकरे आणि राऊतांना धक्का, या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ठेवली मशाल खाली)
अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी पूल विभागाच्या समन्वयाने कर्नाक पूल आणि विक्रोळी पूल या दोन्हीही पुलांची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामांची कालमर्यादा निश्चित केली आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून कामांना अधिक वेग आला आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी कर्नाक पूल प्रकल्पस्थळास भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला. मध्य रेल्वेने (Central Railway) धोकादायक घोषित केलेल्या कर्नाक पुलाची पुनर्बांधणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केली आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. पुलाची लांबी रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर तर पूर्व बाजूला (पी डि’मेलो मार्ग) १५५ मीटर, पश्चिम बाजूला (मोहम्मद अली मार्ग) २५५ मीटर इतकी आहे.
(हेही वाचा – Nala Safai : नाल्यातील गाळ काढण्यास का होतो विलंब, जाणून घ्या हे कारण)
सद्यस्थितीत कर्नाक पुलाच्या (Karnak Bridge) दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग पूर्ण झाले आहेत. पश्चिमेकडील डेक स्लॅबचे कामही पूर्ण झाले आहे. पूर्व बाजूकडील ८० पैकी ४० मीटर लांबीच्या डेक स्लॅबचे काम पूर्ण झाले असून त्याचा क्युरिंग कालावधी सुरू आहे. उर्वरित ४० मीटर अंतरासाठी “अर्ली स्ट्रेन्थ काँक्रिट” चा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून ५ जून २०२५ पर्यंत क्युरिंग कालावधी पूर्ण होईल. रेल्वे हद्दीत अँटी क्रॅश बॅरियर्स (Anti crash barriers) बसवण्याची कामे सुरू आहेत. एकूणच पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे जसे की, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, विद्युत खांब, थर्मोप्लास्ट, कॅट आईज आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे १० जून २०२५ पर्यंत पूर्ण केली जातील. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर व कोणताही अवरोध नसेल त्यावेळी पुलाची ताकद, स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी भार चाचणी घेण्यात येईल, असे बांगर यांनी नमूद केले.
तसेच, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी विक्रोळी उड्डाणपूल प्रकल्पस्थळास भेट देत कामांचा आढावा घेतला. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणारा उड्डाणपूल पूर्व – पश्चिम परिसरासाठी वरदान ठरणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. या उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे.
सद्यस्थितीत विकोळी उड्डाणपुलाची पूर्व दिशेची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. पश्चिम दिशेकडील मास्टिक अस्फाल्टचे काम सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस अँटी क्रॅश बॅरियर्स (Anti crash barriers) आणि नॉईस बॅरियर्स (Noise Barriers) बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच रंगकाम आणि विद्युत खांब बसवण्याचे देखील सुरू करण्यात आले आहे. पश्चिम दिशेस पूल लाल बहादूर शास्त्री मार्गास जेथे मिळतो, त्या ठिकाणी उतार मोठा आहे. या ठिकाणी काँक्रिट भराव टाकून तो भाग उंच करण्यात आला आहे. जेणेकरून खोलगट भागात वेगाने येणाऱ्या वाहनांचा संभाव्य अपघात टाळता येईल. या कॉंक्रिटीकरणाचे क्युरिंग ३० मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल. त्याचबरोबर पुलाची अनुषंगिक कामे देखील पूर्ण होतील. एकूणच ३१ मे २०२५ पर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्धारित उद्दिष्ट साध्य होईल, विश्वास बांगर यांनी व्यक्त केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community